
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्याच्या पूर्वभागातील हिसरे, हिवरे आणि कोळगाव या रस्त्यांची दुरुस्ती व पुलाची उंची वाढवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी मिळूनही काम अद्याप अपूर्ण आहे. ठेकेदार कंपनीकडून चाललेल्या दिरंगाईवर आणि प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेवर करमाळा तालुका युवासेनेकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी सांगितले की, निधी मंजूर असूनही पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. आम्ही वारंवार आंदोलने करून प्रशासनाला आणि ठेकेदाराला सूचना दिल्या, तरीही जाणीवपूर्वक या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
स्थानिक नागरिकांकडून पुलाची उंची वाढवण्याची मागणी होत असून, ठेकेदार कंपनीने त्यालाच कारणीभूत ठरवत काम थांबवले आहे, असा आरोप युवासेनेकडून करण्यात आला आहे. मागील पावसाळ्यातील अनुभव लक्षात घेता पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण होणे आवश्यक होते, परंतु आज हा पुल पाण्याखाली गेल्याने शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली आणि वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
युवासेनेकडून इशारा
पाऊस उघडल्यानंतर फिसरे येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत पुलाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
शंभुराजे फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख, करमाळा.
स्थानिकांचा संताप…
मंजुरी मिळूनही दोन वर्षांपासून पुलाचे काम सुरू झाले नाही. आम्ही वारंवार उंची वाढवण्याची मागणी केली तरी कुणीच दखल घेतलेली नाही. संबंधित अधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने लक्ष घालून आठ दिवसांत काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
अनिल जगदाळे, हिसरे ग्रामस्थ.



