मकाई साखर कारखान्याकडून ऊस वाहतूकदारांना कर्जबाकी नसलेल्या दाखल्यांचे वितरण

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस वाहतूकदारांना बँक ऑफ इंडियाच्या कर्जबाकी नसलेल्या दाखल्यांचे वितरण कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांचे मार्गदर्शन लाभले.
गाळप हंगाम २०१३-१४ मध्ये कारखान्याकडून करारबद्ध वाहनांना ॲडव्हान्स दिला होता. काही वाहतूकदारांची कर्जाची थकबाकी राहिल्याने त्यांना अडचणी निर्माण होत होत्या. परंतु कारखान्याने सर्व थकबाकी फेडून आता वाहतूकदारांना पूर्णपणे कर्जमुक्त केले आहे. या दाखल्यांचे वितरण बागल कार्यालय, करमाळा येथे करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. लोकनेते दिगंबररावजी बागल यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. पुढे बोलताना चेअरमन भांडवलकर म्हणाले की, माजी आमदार शामलताई बागल (मामीसाहेब), रश्मी दिदी बागल व दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल चांगल्या प्रकारे सुरू आहे. येत्या काळात कारखान्याच्या विस्तारीकरणाबरोबरच इथेनॉल प्रकल्प उभारला जाणार असून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल.
या वेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर हरिचंद्र खाटमोडे, जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर जोगळेकर, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी कदम, ऊस पुरवठा अधिकारी गोरख काकडे तसेच वाहतूकदार स्वप्निल गोडगे, विठोबा कोकरे, संभाजी रिटे, हरिश्चंद्र मगर, माऊली खाटमोडे, आजिनाथ गायकवाड, ज्ञानदेव ढोले, ज्ञानदेव ठोंबरे, उद्धव कांडेकर, धनंजय झिंजाडे, प्रताप पोळ, रावसाहेब शिंदे यांच्यासह ॲग्री सुपरवायझर व तालुक्यातील वाहतूकदार उपस्थित होते.



