
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सर्वसामान्य, कष्टकरी व वंचित घटकांच्या जीवनात आनंदाचा झरा निर्माण करणारे, कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांचे कार्य हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व अजरामर असून त्यांचा आदर्श आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. कबीर अत्तार महाराज यांनी केले.
स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त करमाळा येथील सावंत गल्लीतील मारुती मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ व करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने कीर्तन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कीर्तनात बोलताना ह.भ.प. कबीर अत्तार महाराज म्हणाले की,“स्व. सुभाष आण्णा सावंत यांनी कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, हमाल, तोलार यांच्या न्यायासाठी आयुष्य झोकून दिले. ते केवळ सावंत कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण जनतेचे बापमाणूस होते. त्यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. रोहन पाटील, डॉ. बाबूराव लावंड, डॉ. अनुप खोसे, ॲड. नवनाथ राखुंडे, सरपंच धनंजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिरात तब्बल १७४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला पाण्याचा जार भेट देण्यात आला. रक्त संकलनाचे काम श्री कमलाभवानी ब्लड बँक यांनी केले.
कार्यक्रमात आमदार नारायण आबा पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, स.पो.नि. रोहित शिंदे यांच्यासह नगरसेवक, वकिल, डॉक्टर तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन नगरसेवक संजय सावंत, डॉ. संकेत सावंत, सुनिल बापू सावंत, पै. गणेश सावंत, गौरव सावंत आदींसह छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचे सर्व सदस्य, करमाळा तालुका हमाल पंचायतचे सदस्य व कार्यकर्त्यांनी केले.



