आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे म्हणजेच खरा गोपाळकाला- हभप कैलास महाराज नवसरे

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


“हा काला प्रतीकात्मक असून आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होणे हाच खरा काला आहे. पहिला गोपाळ काला गोकुळात झाला, त्यानंतर संत महात्म्यांनी तो पंढरपूरात आणला आणि आता तोच काला गावोगाव भक्तीभाव, अन्नदान व एकोप्याचा संदेश पोहोचवतो आहे.” असे प्रतिपादन हभप कैलास महाराज नवसरे यांनी केले. ते अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगता समारंभातील काल्याच्या कीर्तनावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी गोपाळ काल्यामागील आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करून सामूहिकता, समानता, भक्तीभाव व समाजातील एकोप्याचा महत्त्वाचा संदेश सांगितला.
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने वडगाव दक्षिण येथील महादेव मंदिरात दि. ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचे व्यासपीठ चालक हभप दिपक महाराज परदेशी होते.
दररोज पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन, हरिजागर तसेच भोजन-प्रसादाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहात कु. रामायणाचार्य ज्ञानेश्वरी महाराज सुपनवर, गोरक्षनाथ महाराज खाडे, विनोदाचार्य विनोद महाराज रोकडे, दिपक महाराज परदेशी, पुरुषोत्तम महाराज गेरे, लखन महाराज पवार व बबन महाराज विंचू यांनी किर्तन सेवा केली.
समारोपा दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप कैलास महाराज नवसरे यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर महाप्रसाद वाटपाने सप्ताह सोहळ्याची सांगता झाली.



