हिसरे येथील महिला भटक्या डुकरांच्या हल्यात जखमी! डुकरांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


हिसरे (ता. करमाळा) येथे भटक्या डुकरांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असून यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी हिसरे येथील महिला सौ. अनिता जगदाळे या मोकाट डुकरांच्या हल्ल्यात जखमी झाल्या असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर करमाळा येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मोकाट डुकरांचा सुळसुळाट आणि त्यामुळे होणारी दुर्गंधी यामुळे होणारे आजार ही घातक आहेत. मोकाट डुकरे कळपाने लहान मुले, शाळकरी मुले व वृद्धांवर हल्ला करीत आहेत. यामुळे गावात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत ग्रामस्थ शालन जगदाळे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील मुख्य रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी कळपाने डुकरे फिरत असतात. गावातील जनतेच्या सुरक्षेसाठी तसेच परिसरातील शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायत तसेच पशुसंवर्धन विभागाने तातडीने डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत करमाळा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांना पाठविण्यात आली आहे.



