
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवून चर्चेत असलेल्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीने यंदा भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. गावातील इयत्ता दहावीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते आणि त्याच्या पालकांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली आहे.
यावर्षी इयत्ता दहावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून गावाचा मान वाढवणारी कन्या कु. तन्वी हनुमंत जावळे हिला या उपक्रमाची पहिली मानकरी ठरण्याचा सन्मान मिळाला. आज, शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात तिच्या हस्ते व तिच्या पालकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होईल, तसेच ग्रामपंचायतीला नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.



