ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर क्रांतिकारी ठरणार- श्री. राजेंद्र पवार

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेती व्यवसायात क्रांतिकारी बदल घडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च ४० टक्क्यापर्यंत कमी होऊन पाण्याचीही बचत होते. शिवाय शेती उत्पन्नात दुपटी – तिपटीने वाढ होत असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. असे प्रतिपादन बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केले. ते आज गुरुवार दि. २६ जून रोजी जातेगाव (ता. करमाळा) येथे बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस शेतीतील आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित चर्चासत्र कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आता पारंपारिक शेती करण्याचे आणि त्यातून मर्यादित उत्पन्न मिळवण्याचे दिवस राहिले नाहीत. बदलत्या काळानुसार गरजा वाढत चालल्याने कमी खर्चात, कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. हे तंत्रज्ञान वेळेत स्वीकारल्यास उत्पादन वाढीबरोबरच शाश्वत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, हे लक्षात घेत शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आम्ही गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अभियान राबवत आहे.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषी तज्ञ संतोष करंजे यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच बारामती ॲग्रो चे ऊस विभाग प्रमुख प्रवीण भापकर यांनी ऊस शेतीतील नवे बदल व सुधारणा या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी करमाळ्याचे तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष संतोष वारे, सुजित बागल, बारामती ॲग्रो यु.१ व ३ चे शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच जातेगाव व पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२.५ एकर उसासाठी AI आधारित व्यवस्थापन खर्च
साधारणतः २.५ एकर उसासाठी AI आधारित व्यवस्थापनावर एकदाच २५,००० रुपयांचा खर्च येतो. हा खर्च शेतकऱ्यांना परवडावा यासाठी बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार यांनी मोठा निर्णय घेत, यापैकी १२,५०० रुपये अनुदान स्वरूपात बारामती ॲग्रो कडून दिले जाणार आहेत. उर्वरित १२,५०० रुपये शेतकऱ्यांकडून दोन टप्प्यांत घेतले जाणार आहेत. यामध्ये ६,२५० रुपये एकदा शेतकऱ्यांना भरावे लागतील त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ६,२५० रुपये उसबिलातून भरावे लागणार आहेत.
मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत हा प्रयोग राबवण्यात येत असून आता तो सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बारामती ॲग्रो लि. या साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे.



