
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील वडगाव दक्षिण व उत्तर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आज शनिवार, दिनांक २१ जून रोजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते जेऊर येथील संपर्क कार्यालयात करण्यात आला.
या वेळी करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी चंद्रकांत काळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमास आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी पंचायत समिती सदस्य ॲड. राहुल सावंत, संचालक देवानंद बागल, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, संचालक राजाभाऊ कदम, माजी सरपंच गणेश अंधारे, माजी सदस्य सुदाम काळे, तसेच पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव सरक सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार पाटील म्हणाले की, “वडगाव दक्षिण व उत्तर ग्रामपंचायतीस माझे पूर्ण सहकार्य राहील. गावाच्या रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत समस्यांवर शासनाच्या विविध योजनांतून निधी मिळवून कामे मार्गी लावली जातील. मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश करून नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनीचे ओव्हर फ्लो पाणी मांगी तलावात सोडण्याकरिता मी आग्रही आहे. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार राहुल गोडगे यांनी मानले.



