
करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज नेटवर्क)


सत्ता नसली तरी करमाळा तालुका ही कर्मभुमी म्हणुन शिंदे गट तालुक्यात कायम कार्यरत राहणार असल्याची भूमिका माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी विधानसभेच्या पराभवानंतरच स्पष्ट केलेली असुन शिंदे गटाच्या वाढत्या जनाधारामुळे घाबरलेल्या विरोधकांनी एकमेकांची डोकी फोडलेली विसरून भ्रष्ट मनोमिलन घडवुन आणलेले आहे. परंतु या भ्रष्ट युत्या अल्प कालावधीच्या असणार आहेत. केवळ संजयमामांना रोखण्यासाठी व स्वतःचे राजकीय अस्तित्व राखण्यासाठी ‘पॅच अप’ करणारांनी आपआपली स्वतंत्र ताकद सिद्ध करावी. त्यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे ‘पॅक अप’ होण्याची स्वप्न आता कधीच पाहु नये. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी प्रतिक्रिया देताना मांडले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची दहीगाव उपसा सिंचन योजना मागिल पाच वर्षात माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सक्षमपणे चालवलेली आहे. या योजनेत वाढीव गावांचा समावेश करण्यासह या योजनेला सुधारीत मंजुरी मिळवुन कॅनाल अस्तरीकरणाची कामे याशिवाय, टेलला असणाऱ्या गावांना बंद नलिकेतून पाणी योजना मंजुर करून त्याचे कामही प्रगतीपथावर होते. ज्यामुळे करमाळा तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकऱ्यांचे शेतीला शाश्वत पाण्याचे नियोजन होणार होते. परंतु सत्ता मिळविण्यासाठी पाटील गटासह तालुक्यातील प्रमुख गटांनी साटेलोटे करून आपली दुकानदारी बंद होऊ नये म्हणुन तसेच जनतेची आणि कार्यकर्त्यांची दिशाभुल करून फक्त सक्षम नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांना रोखण्यासाठी कुणी कुणी पॅच अप केले हे जनतेला माहीत आहे. विशेषतः एवढे पॅच अप करून सुद्धा माजी आमदार संजयमामा शिंदे गटाची ताकद वाढतेय हे निवडणुक निकालातून सिद्धच झाले आहे. निवडणुका हरल्या तरी शिंदे गटाची ताकद वाढली आहे हे विरोधकांच्या लक्षात आले आहे.
करमाळा तालुक्यातील आगामी सर्व निवडणुका देखिल संजयमामा शिंदे गट पुर्ण ताकदीने लढवणार असुन, शिंदे गटाचा प्रत्येक कार्यकर्ता माजी आमदार संजयमामांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन करमाळा मतदार संघातील जनसामान्यांसाठी कायम अग्रेसर राहणार आहे. त्यामुळे पाटील गटाचे प्रवक्ते तळेकरांनी काहीतरी चुकीची वक्तव्ये करण्याचे टाळावे. असा सल्ला ही त्यांनी पाटील गटाच्या प्रवक्त्यांना शेवटी बोलताना दिला आहे.



