मा.आ. संजयमामा शिंदे यांनी घेतली शाहूदादा फरतडे यांची भेट; ठाकरेंची शिवसेनाही महायुतीला सहकार्य करणार?

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने करमाळा तालुक्याच्या पुर्वभागातील प्रचार दौर्यावर असताना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या प्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, विश्वंभर फरतडे, शांतीलाल फरतडे यांनी माजी आमदार संजयममा शिंदे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
कोणत्याही परीस्थितीत आदिनाथ सहकारी साखर कारखाना जिंकून यशस्वीपणे चालवून कारखान्याला गतवैभव निर्माण करून देण्याचा निर्धार केल्याने संजयमामा शिंदे यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी सालसे ऊस उत्पादक गटातील उमेदवार नवनाथ जगदाळे उद्धवदादा माळी व हिवरे येथील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
फरतडे हे अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. बंडखोरी नंतर देखील त्यांनी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने पक्षाने त्यांना उपजिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनी करमाळा तालुक्यातील समाजहिताच्या प्रश्नावर सातत्याने जनआंदोलने केली आहेत. कुकडीचे ओव्हर फ्लो पाणी सिना कोळगाव धरणात सोडवण्यासाठी करमाळा ते मुंबई पायी दिंडी, कर्जमाफी साठी आंदोलन, ऊस वाहतुकदारांसाठी तसेच सर्वच कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी त्यांनी यशस्वी आंदोलन केली आहेत. तसेच प्रत्येक निवडणूकीत ते पक्षाच्या आदेशा प्रमाणे सक्रिय राहिले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत पक्षादेश मानून त्यांनी खा. धैर्यशिल मोहिते पाटील व आमदार नारायण पाटील यांच्या साठी झोकून काम केले होते. मात्र आता आदिनाथच्या निवडणूकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या पॅनेलला कारखाना निवडणूकीत ते संजयमामा यांना बळ देतील का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ
आदिनाथ कारखाना हे शेतकऱ्यांचे मंदिर असून त्यास पुन्हा गतवैभव प्राप्त झाले पाहिजे. कामगार व उस उत्पादक शेतकरी यांची थकीत देणी मिळावीत तसेच फसवणूक झालेल्या उसवाहतुकदार यांना न्याय देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे, अशी आमची भुमिका आहे. हा शब्द दिल्यास शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेऊ.
श्री. शाहूदादा फरतडे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख)



