
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र संगोबा (ता. करमाळा) येथे दोन दिवस यात्रा भरते. संगोबा हे गाव अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर या तीन जिल्ह्याच्या सीमेवर सीना नदीकाठी वसलेले असून या ठिकाणी आदिनाथ महाराजांचे मंदिर आहे. तीनही जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात यात्रेला सुरुवात झाली. पहाटे महाअभिषेक, नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी पाच वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली.

संगोबा येथील यात्रेत सकाळी दहा वाजले नंतर मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली. दर्शन रांगेतही योग्य नियोजन नसल्यामुळे गर्दी झाली होती. भाविकांना आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी दोन तासापेक्षा अधिक वेळ उन्हात ताटकळत दर्शन रांगेत थांबावे लागले. यात्रेत दुकान लावण्यासाठी छोट्या व्यवसायिकांनीही मोठी गर्दी केली होती. यामध्ये प्रामुख्याने मिठाई, खेळणे, थंडपेये, फळे, फराळाचे पदार्थ, कपडे, शोभेच्या वस्तू अशी विविध प्रकारची दुकाने व्यवसायिकांनी थाटली होती.
यात्रा प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनाचा त्रास मात्र भाविकांना सहन करावा लागला. वाहन तळाच्या अपुऱ्या जागेमुळे भाविकांनी जागा मिळेल तिथे वाहने लावल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खांबेवाडी पर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याने भाविकांना वाट मिळेल तेथून चालत मंदिरापर्यंत जावे लागले. त्यामुळे कोणाचा त्रासही सहन करावा लागला.




