प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या नावाने करमाळ्यात उद्या शिवजयंतीच्या निमित्ताने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता होत असून यामध्ये हॉस्पिटलमध्ये अल्प दरात रुग्णांना रुग्णसेवा देणार असल्याची माहिती डॉक्टर ओंकार उघडे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, हॉस्पिटलचे सचिव दीपक पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे.
शंभर रुपयांमध्ये रुग्णांची तपासणी करून व इंजेक्शन दिले जाणार असून पुढील सात दिवस मोफत रेगुलर तपासणी केली जाणार आहे. सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे येथून नामांकित डॉक्टर दर आठवड्याला करमाळ्याला येणार आहेत. अत्यंत माफक दरात उपचार व ऑपरेशन करण्याची सोय या माध्यमातून करमाळा वासियांना होणार आहे. या ठिकाणीच खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोफत डायलिसिस सेंटर सुरू असून कै. मनोहरपंत चिवटे संचलित, श्री कमला भवानी ब्लड बँक ही सुरू आहे.
डॉक्टर ओंकार उघडे हे एमबीबीएस पदवी प्रदान केलेले डॉक्टर असून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रुबी हॉल, केईएम हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. हृदयविकार, कॅन्सर, दमा, त्वचारोग, लिव्हर, किडनी, गुडघा, मणका ऑपरेशन, सर्पदंश उपचार आदींची सोय करून दिली जाणार आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना जास्तीत जास्त मोफत सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशी माहिती सचिव दीपक पाटणे यांनी दिली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना अत्यंत अल्प दरात चांगली, दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून करमाळा तालुक्यातील कोणताही रुग्ण उपचाराविना किंवा मार्गदर्शना विना परत जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊन “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद वाक्य घेऊन काम करू असे डॉ. ओंकार उघडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



