
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


परशुराम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव (ता. करमाळा) येथे सामाजिक बांधिलकी जपत दसऱ्याचे औचित्य साधून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी व शाळा सक्षम व्हावी. या हेतूने सहा स्मार्ट टीव्ही संच भेट म्हणून देण्यात आले आहेत. त्याच बरोबर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये बसवण्यात आलेल्या १० सीसीटीव्ही कॅमेराचे देखील उद्घाटन या निमित्ताने रावगावचे सरपंच संदीप शेळके, उपसरपंच भाऊसाहेब करगळ, प्रमुख पाहुणे गणेश करे पाटील, दादासाहेब जाधव, विलास बरडे, रामदास बाबर, नानासाहेब जाधव, देवीदास बरडे, बाबूराव पाटील, भरत धगाटे, भाऊसाहेब बुधवंत, अनिल पवार, दादासाहेब पवार, प्रवीण कांबळे, महावीर पवार, रावगाव ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इ. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना करे पाटील म्हणाले की, आपल्या आई वडीलांच्या कष्टाचे चिज सर्व विद्यार्थ्यानी करावे. पंडित जवारलाल नेहरू विद्यालय एक आदर्श विद्यालय आहे. या ठिकाणी प्रत्येक वेळी आल्यानंतर काही तरी नाविन्यपूर्ण बाब बघायला मिळते. या विद्यालयातील विद्यार्थी ही गुणवंत, कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणारे व आपल्या यशाची चमक दाखवणारे आहेत. त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांचा त्यांच्या कार्याबद्दल गौरव करताना भविष्यात शाळेतील एखादा शिक्षक राष्ट्रपती पदक विजेता व्हावा, अशी भावना व्यक्त केली. शेवटी बोलताना पद्माकर वैद्य यांच्या कवितेने विद्यार्थ्यांमधील वातावरण चैतन्यमय करून टाकले.
यावेळी आदर्श शाळा तसेच आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल रावगाव ग्रामस्थांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार सुरेश बरडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच संदीप शेळके म्हणाले की, या शाळेतील शिक्षकांचे कार्य समर्पण आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आम्ही गावकरी प्रभावित झालो आहोत. शाळेतील शिक्षक आणि आमच्या गावकऱ्यांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण झाले असून शाळेच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वजण शिक्षकांच्या पाठीशी कायम राहू. शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने गौरविले याचा आम्हा सर्व गावकऱ्यांना खूप आनंद व अभिमान आहे.
यावेळी पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त झालेल शिक्षक श्री सुहास कानगुडे व पप्पु राठोड यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप बरडे सर यांनी केले. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कोळेकर यांनी केले तर आभार किरण परदेशी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



