दूध अनुदान योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे अनुदान जमा- गणेश चिवटे

करमाळा/ प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


राज्य सरकारने जाहीर केलेल्या दूध अनुदान योजनेनुसार दुसऱ्या टप्प्याचे दूध अनुदान आजपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री गणेश चिवटे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, दूध खरेदी दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ११ जानेवारी ते १० मार्च दरम्यानचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वीच जमा झाले आहे. मात्र दुसऱ्या टप्प्याचे अनुदान जमा होणे बाकी होते. दुसऱ्या टप्प्यातील जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२४ दरम्यानचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. जुलै महिण्यातील दुधाचे अनुदान आज पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार या दूध अनुदान योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये ऐवजी सात रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही नवीन अनुदान योजना एक आक्टोबर पासून लागू होणार आहे. दुधाचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आपण महसूल व दुग्धविकास मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे अनुदान जमा झाल्याची माहिती गणेश चिवटे यांनी दिली आहे.



