
माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


शेलगाव क (ता.करमाळा) श्री. सुरेश शिंदे गुरुजी यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून त्यांनी शिक्षकांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी, शिक्षकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी विजय दादांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह मोहिते पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था काढली. तसेच शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघटनात्मक प्रयत्न केले. प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. वीस पटाच्या आतील शाळा बंद करणे, शाळेवर एकच शिक्षक ठेवणे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून यासाठी शासन दरबारी प्रश्न मांडून सोडवण्याचे आश्वासन माढ्याचे खासदार धैर्यशीलभैया मोहिते पाटील यांनी दिले. ते पांडे येथील कमलाई मंगल कार्यालयात आयोजित शिक्षक सुरेश शिंदे यांच्या सेवापुर्ती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
अधिक बोलताना मोहिते-पाटील म्हणाले की, शिंदे गुरुजी यांनी शैक्षणिक व सामाजिक प्रश्नासाठी सदैव कार्यरत राहावे. यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले व त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी श्री. शिंदे गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून उर्वरित निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक डॉ. संजय चौधरी सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शिक्षकांचे समाजातील स्थान व अपेक्षा यावर सरांनी व्याख्यान दिले व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, माजी सभापती अतुल पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत, अजित तळेकर, किरण बोकन, अमरजीत साळुंखे, बंडू माने, बार्शीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र माळी, आदर्श शिक्षक समितीचे माजी राज्य अध्यक्ष अंकुश काळे, जिल्हा नेते राजकुमार राऊत, मुकुंद तांबिले, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजीव चाफाकरंडे, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष विजय गुंड, शाळा व्यवस्थापन समिती हिवरेचे अध्यक्ष समाधान फरतडे, विजयसिंह मोहिते पाटील पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय जाधव, सचिव संतोष शितोळे व सर्व संचालक मंडळ तसेच शेलगाव (क) ग्रामस्थ, हिवरे ग्रामस्थ, विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी तसेच शिक्षक मित्रपरिवार व नातेवाईक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिव श्रीकृष्ण अडसूळ यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले.



