-->
करमाळाराजकिय

शिवसेना-भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अन्यथा..; जिल्हाप्रमुख चिवटे यांची भूमिका!

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

आगामी विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदासंघांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो उमेदवार देतील तो प्रचंड मताधिक्याने आम्ही निवडून आणणार मात्र उपरा उमेदवार स्वीकारणार नाही, अशी भूमिका सर्व शिवसैनिकांची आहे. असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठी, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड आदी पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी युवा सेनेच्या ५१ शाखा प्रमुखांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

करमाळा विधानसभा शिवसेना ३० वर्षापासून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहे. यामुळे या निवडणुकीत सुद्धा धनुष्यबाणाचा उमेदवार असणार आहे असा दावा शिवसेनेने यापूर्वीच केला आहे. सध्या एकनाथ शिंदे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री असून तो जो उमेदवार देणार तो निवडून येणार यात शंका नाही. तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा समर्थक आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश करून करमाळ्याची जागा भाजपकडे घेऊन बागल गट कमळावर निवडणूक लढवणार असा दावा केला आहे. मात्र याला शिवसेनेचा कडाडून विरोध आहे.

 

याबाबत मेळाव्यात बोलताना महेश चिवटे म्हणाले की, करमाळा विधानसभा मतदारसंघात ३० ते ३५ हजार मतदान शिवसेनेचे असून आतापर्यंत तीन वेळा धनुष्यबाणावर निवडणूक जिंकलेली आहे. कसल्याही परिस्थितीत ही आमची हक्काची जागा सोडणार नाही. याबाबत आम्ही सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्षी विरोध केला तेच लोक आता महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते त्याला शंभर टक्के निवडून आणतील. मात्र उपरा उमेदवार दिला तर निवडणूक जड जाईल असा अहवाल आम्ही पक्षश्रेष्ठींना दिला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी सात जागा शिवसेना लढवत होती. आता शिवसेनेच्या वाट्याला केवळ दोन जागा देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे. किमान सोलापूर जिल्ह्यात पाच जागा शिवसेनेला पाहिजेत अशी मागणी आम्ही सर्व पाच जिल्हाप्रमुखांनी पक्षाकडे केली आहे.

 

आज करमाळा तालुक्यातील जनता जुन्या पुढाऱ्यांना कंटाळली असून गेल्या पंचवीस वर्षात तालुक्याच्या विकासाला खीळ बसली असून यासाठी आता नवीन चेहऱ्याची गरज आहे. गटातटाचे राजकारण करून सत्ता व संपत्तीचे वाटप करणारे नेतेमंडळी उघडे पडले असून शिवसेना या निवडणुकीत सर्वांचा चेहरा समोर आणणार आहे असा दावा शेवटी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला.

 

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तरी आम्ही त्याला निवडून आणू मात्र, इतर पक्षातील उमेदवार आणला तर सेना भाजपचे कार्यकर्ते काम करणार नाहीत.

श्री. नवनाथ गुंड, तालुकाप्रमुख, युवा सेना करमाळा

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close