माय मराठी न्युज


वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका २७ वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांची कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री आरोपी मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या जन्मदात्या पित्याला संपवलं आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच, गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जऊळका पोलीस ठाण्यात आरोपी मुला विरोधात ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाची चौकशी केली असता, हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
लग्न लावून देण्यासाठी बाप उशीर करत असल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या बापाची कुऱ्हाडीचे वार करून हत्या केली आहे. धर्मा भारती असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव असून ते वाशिम जिल्ह्याच्या जऊळका येथील रहिवासी आहेत. तर प्रमोद भारती असं अटक केलेल्या मुलाचं नाव आहे. आरोपी मुलगा प्रमोद हा २७ वर्षांचा असून त्याला विविध प्रकारचे व्यसनं आहेत. प्रमोद भारती हा आपल्या वडिलांशी लग्नाच्या कारणावरून नेहमी वाद घालायचा. याच मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने वडिलांवर कुऱ्हाडीचे वार केले. या हल्ल्यात धर्मा भारती हे गंभीर जखमी झाले असता त्यांना अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.



