मकाई कारखाना २५ जानेवारीपर्यंत ऊसबिल देणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन; अन्यथा २६ जानेवारीला आत्मदहन करणार- प्रा. रामदास झोळ

करमाळा/प्रतिनिधी


मकाई सहकारी साखर कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या ऊसाचे थकीत बिल २५ जानेवारीपर्यंत संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. असे मकाई कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी सांगितले आहे. असे मत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मकाई कारखान्याचे थकीत ऊस बिल शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आयोजित केलेल्या प्रादेशिक सहसंचालक साखर संघ, शेतकरी, मकाईचे संचालक व पदाधिकारी यांच्या बैठकीत व्यक्त केले. मकाई कारखान्याचे मागील वर्षाचे थकीत ऊसबिल शेतकऱ्यांना मिळावे. यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार दि. ३ जानेवारी रोजी बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये प्रा. रामदास झोळ सर, शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ अण्णा कांबळे, ॲड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, शेतकरी प्रतिनिधी हरिदास मोरे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने व शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच मकाई कारखान्याच्या वतीने कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर, कार्यकारी संचालक हरिचंद्र खाटमोडे तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. मकाई कारखान्याचे ऊसबिल मागील वर्षीपासून थकीत असून ते शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा करण्यात यावे. अशी मागणी प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मकाई कारखान्याने ऊस बिल थकवल्यामुळे शेतकऱ्यावर सावकारी कर्ज काढून मुलांचे शिक्षण, लग्न, दवाखाना व ईतर कामे करण्याची वेळ आली आहे. शेतकर्याना ऊसबिल लवकर मिळावे, यासाठी आम्ही वारंवार धरणे आंदोलन, बोंबाबोब आंदोलन, थू थु आंदोलन केले. याची आपण गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला उसबिलासंदर्भात शब्द दिला आहे. २५ जानेवारीपर्यंत आम्ही आपल्या शब्दाला मान देऊन थांबू. २६ जानेवारीला आम्ही सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी यावेळी सांगितले.
याबाबत मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल म्हणाले की, आम्ही मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल देण्यासाठी कटिबद्ध असून कोणत्याही परिस्थितीत लवकर शेतकऱ्यांना ऊस बिल मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मकाई साखर कारखान्याच्या भवितव्याच्या दृष्टीने व आमच्या गटाच्या दृष्टिकोनातून आम्ही शेतकऱ्याची ऊस बिल लवकरात लवकर देऊ असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रा. रामदास झोळ, मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व शेतकरी बांधवांबरोबर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल २५ जानेवारी पर्यंत देण्यात यावे. यासाठी मकाईचे चेअरमन व संचालक मंडळ यांना तशा सूचना आदेश दिले आहेत. २५ जानेवारी पर्यंत ऊस बिल न मिळाल्यास २६ जानेवारीला शेतकरी बांधवांसह सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे.



