-->
करमाळाकृषी विषयकराज्य

कर्जाचे पुनर्गठन करण्यासंदर्भात शिखर बँकेचे आदिनाथला पत्र; कारखाना सहकार तत्वावर सुरु होण्याच्या आशा पल्लवित

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

शासनाच्या एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत ११ कोटी रुपये शिखर बँकेकडे भरा व उर्वरित कर्जाचे पुनर्गठन करून घ्या. अशा आशयाचे पत्र राज्य सहकारी बँकेने ०६ जून २०२२ रोजी एटीएस पत्र क्रमांक १०५० प्रमाणे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक व संचालक मंडळाला दिले आहे. शिखर बँकेच्या या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू होण्या बद्दलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

३०० कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना बेकायदेशीर रित्या सर्व नियम धाब्यावर बसवून हा कारखाना बारामती अग्रो ला चालविण्यास देण्याचा प्रयत्न चालू होता. दोन वर्षांपूर्वी बारामती अग्रोने आदिनाथच्या लिलावाची बोली लावून प्रत्यक्षात मात्र आदिनाथ कारखाना बंद कसा राहील हा दृष्टिकोन ठेवून आदिनाथ ची लिलाव प्रक्रिया लांबवली. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांच्यामध्ये प्रचंड संतापाची लाट होती. सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांना ३०० ते ४०० कोटी रुपये कर्जाचे पुनर्गठन करून दिले. मात्र, आदिनाथ कारखान्याच्या केवळ ४५ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी लिलाव काढला होता.

या शिखर बँकेच्या गैर कारभाराला आदिनाथ चे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी बचाव समितीच्या माध्यमातून विरोध केला होता. सध्या पुणे येथील कर्ज वसुली प्राधिकरण न्यायालयात आदिनाथ कडील कारखान्याची कर्ज वसुलीची केस सुरू आहे. यामुळे या निर्णयाचा या निकालावरील परिणाम होण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना हरिदास डांगे म्हणाले की, आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा रहावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता राज्य सहकारी बँकेने केवळ अकरा कोटी रुपये भरून कर्जाचे पुनर्गठन करून देण्याचे लेखी पत्र दिले आहे. शिवाय दिल्ली येथील एनसीडीसी बँकेने सुद्धा पाच टक्के रक्कम भरून कर्जाचे पुनर्गठन करून देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकार तत्त्वावर चालविण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

आजअखेर कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे ६४ कोटी रुपये कर्ज असून त्यावरील ४५ कोटी रुपये व्याज आहे. असे मिळून ११० कोटी रुपये कर्ज आहे. यापैकी ५५ कोटी रुपयाची साखर कारखान्यात शिल्लक आहे. आता शिखर बँकेने नमते घेऊन आदिनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाला एक रकमी परतफेड योजने मध्ये सहभागी होऊन कारखाना ताब्यात घेण्याची ऑफर दिली आहे. आता आदिनाथ कारखान्याचे संचालक मंडळ व बचाव समितीचे पदाधिकारी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

राज शेटे देशमुख, राष्ट्रीय समाज पक्ष, तालुका अध्यक्ष

 

बारामती ॲग्रो ने करार करून सुद्धा दोन वर्ष कारखाना बंद ठेवून करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्यांनी आता तरी या स्पर्धेतून माघार घेऊन कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवावा. आता जर रोहित पवार यांनी पुन्हा आदिनाथ बंद पाडण्यासाठी सुभाष गुळवे ला पुढे करून न्यायालयातून प्रयत्न केल्यास बळीराजा शेतकरी संघटना पवार कुटुंबांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल. असा इशारा अण्णा सुपनर यांनी दिला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close