कोरेगाव भीमा येथील बाजारपेठ झेंडूच्या फुलांनी सजली
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


खंडे नवमी व विजयादशमी निमित्ताने कोरेगाव भीमा येथील मुख्य बाजारपेठ विविध वस्तू व झेंडूच्या फुलांनी सजली असून कोरोनाचे रुग्ण गावात व परिसरात कमी असल्याने दसऱ्याला लागणाऱ्या झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी पंचक्रोशीतील लोक बाजारपेठेत गर्दी करत आहेत.
मागील दीड वर्षांपासून कोरोना रुग्ण वाढत असल्याने विजयादशमी कमी प्रमाणात साजरी करण्यात येत होती. परंतु यंदाच्या वर्षी वाढलेल्या लसीकरण मोहिमेमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याने झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल कोरेगाव भीमा च्या बाजारपेठ मध्ये सुरू आहे. ७० रुपयांपासून ते अगदी १०० रुपयां पर्यंत फुलांचे बाजारभाव असून उद्या दसऱ्याच्या दिवशी बाजारभाव वाढण्याची शक्यता असल्याचे झेंडूच्या फुलांची शेती करणारे अविनाश गव्हाणे व अमोल गव्हाणे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी फुलांचे नुकसान झाले असले तरी ही यंदा झेंडू च्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत असल्याचे चित्र कोरेगाव भीमा व परिसरात पहायला मिळत आहे.



