अखेर प्रवासी संघटनेच्या मागणीला यश; उद्यापासून पारेवाडी स्टेशनवर ‘या’ गाडीला मिळाला थांबा

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)


रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला मोठे यश मिळाले असून पारेवाडी (ता. करमाळा) स्थानकावर उद्या दि. १४ मार्च पासून पुणे-हरंगुळ-पुणे या गाडीला प्रायोगिक थांबा मिळाला आहे. अशा माहितीचे प्रसिद्धीपत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे प्रवाशांच्या माहितीसाठी जारी करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वे प्रशासनाने १४ मार्च २०२४ पासून पारेवाडी स्थानकावर गाडी क्र. 01487/01488 पुणे- हरंगुळ- पुणे या विशेष गाडीला प्रायोगिकपणे थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. १४ मार्च २०२४ पासून, गाडी क्रमांक 01487 पुणे-हरंगुळ पारेवाडी स्थानकावर ०८.०८ वाजता पोहोचेल आणि ०८.१० वाजता सुटेल. तर ट्रेन क्रमांक 01488 हरंगुळ – पुणे १४ मार्च २०२४ पासून पारेवाडी स्थानकावर १८.२३ वाजता पोहोचेल आणि १८.२५ वाजता सुटेल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
हा रेल्वे प्रवासी संघटनेच्या एकजुटीचा विजय
रेल्वे प्रवासी संघटनेच्या एकजुटीचा हा विजय असून आमच्या मागणीला यश मिळाल्याचे समाधान आहे. परंतु चेन्नई मेल गाडी पारेवाडी स्थानकावर थांबावी ही आमची आग्रही मागणी होती आणि राहणार आहे. आमच्या मागणीचा विचार करून सध्या पुणे हरंगुळ पुणे या गाडीला पारेवाडी स्थानकावर थांबा मिळाला आहे. पुणे येथे ये जा करणाऱ्या प्रवाशांना याचा निश्चित फायदा होईल. परंतु आमची मुख्य मागणी कायम असून त्याकरिता खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याबरोबर राहून मुख्य मागणीची सोडवणूक करून घेणार आहे.
ॲड. अजित विघ्ने,
ता. प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, करमाळा माढा विधानसभा
जास्तीत जास्त प्रवाशांनी या गाडीतून प्रवास करावा
पारेवाडी रेल्वे स्टेशन व परिसरातील सर्व नागरिक व रेल्वे प्रवाशांच्या पाठपुराव्यामुळे तसेच खा. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे पुणे हरंगुळ पुणे या गाडीला उद्या दि. १४ मार्चपासून थांबा मिळाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी पुणे हरंगुळ पुणे या गाडीतून प्रवास करावा.
उदय खाटमोडे पाटील, ग्रामस्थ केत्तूर नं.२




