कामोणेतील प्रगतशील शेतकरी काळे यांना राज्य शासनाचा ‘उद्यानपंडित पुरस्कार’ जाहीर

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)


कामोणे (ता.करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब नामदेव काळे यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांपैकी एक असलेला ‘उद्यानपंडित पुरस्कार’ जाहिर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा कृषी विभागाच्या शिफारशीनुसार व महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाचे उपसचिव संतोष कराड यांनी केली आहे.
राज्यात कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने सन २०२०, २०२१ व २०२२ करीता विविध कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यातीलच पुणे विभागातून सन २०२१ चा ‘उद्यानपंडित पुरस्कार’ करमाळा तालुक्यातील कामोणे गावचे सुपुत्र बाळासाहेब काळे यांना जाहीर झाला आहे.
बाळासाहेब काळे यांनी आधुनिक पद्धतीने शेती करित असताना शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करून ते यशस्वी ही केले आहेत. राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वच स्तरातून काळे यांचे कौतुक होत आहे.



