करमाळा प्रतिनिधी


करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगांव, ता.माढा या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २०१३ साली खत देतो म्हणून कागदपत्रे जमा केली. संबंधित शेतकऱ्यांना खत न देता दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन पुण्यातील कोथरुड परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे कर्ज स्वरुपात रक्कम रु. २२ कोटी ११ लाख उचलल्याचे समोर आले आहे.शेतकऱ्यांना न कळविता कर्ज काढून आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर २ ते ३ लाखाचे कर्ज आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व कारखान्याचे चेअरमन आणि संबंधित अधिकारी तसेच पंजाब नॅशनल बँकेचे त्यावेळेचे शाखाधिकारी व आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आज अतुल खुपसे पाटील यांनी पंजाब नॅशनल बँकेसमोर प्रथम भीक मागो आंदोलन व नंतर अर्धनग्न आंदोलन केले.
आंदोलनावेळी अतुल खुपसे म्हणले की, भिक मांगो आंदोलनातून जमा झालेली निम्मी भिक बँकेच्या अधिकाऱ्यांना सुपूर्त करणार आहोत तर निम्मी भिक करमाळयाचे आ. संजयमामा शिंदे यांना पाठविणार आहोत. करमाळा तालुक्यातील शेतकरी आज पहिल्यांदाच पुण्याला आलेले असून त्यांना पंजाब नॅशनल बँक कुठे आहे हे पण माहित नाही. परंतु तरीही कर्ज काढलेले आहे. काही शेतकरी तर आज पहिल्यांदाच पुण्याला आले आहेत. पंजाब नॅशनल बँक कागदपत्रे न देता व बँकेत न येता ही सेविंग अकाउंट काढून कर्ज काढत असेल तर पोलीस प्रशासन त्यांच्यावर का गुन्हे दाखल करत नाही. पोलीस पंजाब नॅशनल बँकेच्या नावाने गुन्हे दाखल करत नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काल पासून मला फोन येत आहेत की तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील, पुण्यात कोरोना च्या काळात आंदोलन करता येत नाही. सर्वसामान्य शेतकरी माझ्यासोबत आहे त्यामुळे आमचं आंदोलन कितीही दडपण्याचा प्रयत्न केला गेला तरी न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असून याला सर्वस्वी राज्य सरकार व प्रशासन जबाबदार असेल.
दरम्यान या वेळी अतुल खुपसे व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाकडून अटक करण्यात आली आहे. या वेळी अतुल खूपसे यांनी राज्य सरकार कडून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.




