-->
करमाळागड किल्ले

प्रवास गड-किल्ल्यांचा ध्यास दुर्ग संवर्धनाचा ; त्र्यंबकगड

त्रंबकगड / ब्रम्हगिरी ( Trambakgad )

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग गेली आहे.. याच डोंगररांगेला त्र्यंबक रांग असेही म्हणतात. प्राचीन काळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा एक मार्ग याच रांगेतून जात असे, म्हणून त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी किल्ला उभारला गेला होता. हा किल्ला मध्ययुगीन काळापासून अजिंक्य आहे. हा किल्ला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेले “त्र्यंबकेश्वर” या नावाने प्रसिद्ध आहे.

या किल्ल्यावरून उगम पावणारी गौतमी गंगा ऊर्फ गोदावरी या ठिकाणाहून दक्षिणवाहिनी होते, त्यामुळे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील किल्ल्यांचे उल्लेख पुराणातही आढळतात.

इ.स. १२७१ – १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.

इ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’.
यावर बादशहा म्हणतो, ‘‘त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा, त्याचे चीज होईल हे जाणावे.’’
यानंतर मातबार खान किल्ला कसा घेतला, हे औरंगजेबाला पत्रातून कळवितो, ‘ गुलशनाबाद नाशिकच्या ठाण्यात आमचे सैन्य फार थोडे होते. या भागात मराठ्यांच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या पसरल्या ही परिस्थिती पाहून मी त्र्यंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ त्र्यंबक किल्ल्याचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले. आपल्या कृपेने त्र्यंबकचा किल्ला आमच्या ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना कोणत्या मनसबी द्यावयाच्या याचा तपशील सोबतच्या यादीवरून दिसून येईल. त्याची अर्जी आणि किल्ल्याच्या किल्ल्या या काका मनसबदार भावाबरोबर पाठविल्या आहेत, त्या पहाण्यात येतील’.

इ.स. १७१६ मध्ये शाहूने किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली, पण ती फेटाळली गेली. इ.स. १७३० मध्ये कोळयांनी बंड करून तो घेतला. पुढे १८१८ पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता

किल्ल्यावरील पाहण्याची ठिकाणे :-

त्रिंबकगडाचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठार आहे. पठारावर पोहोचल्यावर पायर्‍यांच्या वाटेने समोरच्या उंचवटयाच्या दिशेने चालावे. मध्येच एक वाट डावीकडे ‘सिद्धगुंफे’ पाशी जाते. या ठिकाणी कडयात खोदलेली एक गुहा आहे. ही पाहून पुन्हा वाटेला लागावे. पुढे थोडयाच वेळात पायर्‍यांची वाट दुभागते. प्रथम उजवीकडच्या वाटेला वळावे १५ मिनिटांतच आपण मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणीच गौतमी गंगेचा ऊर्फ गोदावरी नदीच्या उगमाचे स्थान आहे. हे सर्व पाहून डावीकडच्या वाटेला वळावे. १० मिनिटांतच आपण दुसर्‍या मंदिराजवळ पोहोचतो. याच ठिकाणी शंकराने आपल्या जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली हे सर्व पाहून परतीच्या वाटेला लागावे.
याशिवाय किल्ल्यावर काही प्राचीन वाडयांचे अवशेष आहेत. समोरच त्र्यंबक रांगेतील अंजनेरी, हरिहर किल्ले दिसतात.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, मात्र पायथ्याच्या त्र्यंबकेश्वर गावात राहण्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्स आहेत.

जेवणाची सोय :
जेवणाची सोय त्र्यंबकेश्वर गावात आहे.

पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
त्र्यंबकेश्वर मंदिरापासून दीड तास लागतो.

 

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close