-->
क्रीडाराज्य

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपविजेत्या मल्लाला चांदीची गदा देणार- डॉ. धवलसिंह मोहिते पाटील

 

माळशिरस/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने धाराशिव येथे होणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपविजेता ठरणाऱ्या उपमहाराष्ट्र केसरी मल्लाला कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्यात येणार असल्याचे कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. प्रतापगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, मुन्ना डमरे, ज्ञानदेव पालवे प्रमुख उपस्थित होते.

 

या प्रसंगी बोलताना डॉ. धवलसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले की, कै. प्रतापसिंह मोहिते पाटील हे स्वतः चांगले मल्ल होते. त्यांना कुस्तीची आवड होती. त्यांनी अनेक महाराष्ट्र केसरी निर्माण केले. कुस्तीगीर परिषदेच्या वतीने होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हि मॅट व माती या दोन विभागातून प्रथम येणाऱ्या मल्लांमध्ये लढवली जाते. दोन्हीही मल्ल प्रथम क्रमांकाचे असल्याने ताकतीचेच असतात. काही गुणांच्या वरती हार जीत ठरते. विजयी उमेदवाराला महाराष्ट्र केसरीची गदा दिली जाते. परंतु, उपविजेता देखील मल्ल हा तितक्याच ताकतीचा असतो. त्यांच्या मनामध्ये पराभवाची भावना येऊ नये, या करीता त्यांच्यासाठी देखील चांदीची गदा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील कुटुंबीयांच्या वतीने आपण देत आहोत. स्व. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, स्व. वसंतदादा पाटील, स्व. मामासाहेब मोहोळ यांनी कुस्तीगीर परिषद स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. सहकार महर्षीनी माळशिरस तालुक्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली.

 

माळशिरस तालुक्यातील छोटा रावसाहेब मगर, तानाजी बनकर यांनी महाराष्ट्र केसरी तर अनेक मल्लांनी उपमहाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक मल्ल महाराष्ट्र केसरी, ऑलंपिक स्पर्धेपर्यंत गेले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. सुधीर रास्ते यांनी आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close