बारामती ॲग्रो यु.१ प्रमाणेच हाळगाव येथील कारखाना ऊस बिल देणार- सुभाष आबा गुळवे
करमाळा तालुक्यातील आदिनाथ साखर कारखान्यावर ही केले भाष्य

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


हाळगाव (ता. जामखेड) येथील बारामती ॲग्रो (जय श्रीराम शुगर) यु. ३ या साखर कारखान्याकडे ऊस गाळपासाठी देणाऱ्या ऊस उत्पादकांना शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो यु. १ च्या उस दराप्रमाणेच दर देणार असून १५ दिवसांत ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष (आबा) गुळवे यांनी जाहीर केले. ते हाळगाव येथील बारामती अग्रो (जय श्रीराम शुगर) यु. ३ च्या मोळी पूजन व सन २०२३-२४ ऊस गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते. आज शुक्रवार दि. २७ ऑक्टोबर रोजी या साखर कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ गतवर्षी सर्वाधिक ऊस दिलेले १८ शेतकरी व संचालकांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सुरेश भोसले, सुधीर राळेभात, दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, पोपट खोसे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखान्याच्या गाळप हंगामास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अधिक बोलताना ते म्हणाले की, हा साखर कारखाना जामखेडकरांसाठी जीवनदायीनी ठरणार आहे. तसेच भविष्यात या कारखान्याची गाळप क्षमता १०००० मे. टन प्रतिदिन एवढी होणार असून नगर जिल्ह्यात सर्वाधिक चांगला दर देणारा हा साखर कारखाना ठरणार आहे. बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बेणे, खत व ठिबक सिंचन या सुविधा देणार आहे. साखर उत्पादना बरोबरच उपपदार्थ निर्मिती करणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त ऊसदर शेतकऱ्यांना देता येईल. कर्जत, जामखेड, आष्टी, परांडा व करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस बारामती ॲग्रो (जय श्रीराम शुगर) यु.३ या साखर कारखाण्याकडे गाळपास द्यावा. असे आवाहनही त्यांनी शेवटी बोलतांना केले.
यावेळी बारामती ॲग्रो जय श्रीराम शुगर यु. ३ चे सर्व संचालक, राजकीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे सर्व अधिकारी, खातेप्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे व्हाईस चेअरमन के. एन. निंबे साहेब यांनी केले. तर आभार शेती अधिकारी एम. एम. मोहिते साहेब यांनी मानले.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ साखर कारखान्यावर ही केले भाष्य
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रो च्या माध्यमातून चालू करण्यासाठीची सर्व प्रक्रिया केलेली असतानाही जामखेड तालुक्यातील काही विघ्नसंतोषी राजकीय पुढार्यांनी करमाळा तालुक्यातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून सत्तेच्या जोरावर अडचणी आणल्या. त्यामुळेच आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोच्या माध्यमातून चालू करता आला नाही.
कर्जत-जामखेडचे आ. रोहित दादा पवार अडचण व निकड पाहून काम करतात.
कर्जत व जामखेड तालुक्याचे आमदार रोहित दादा पवार हे सर्वसामान्य नागरिक, युवक व विद्यार्थी यांच्या अडचणी व निकड पाहून काम करतात. आ. रोहित पवार यांनी कर्जत जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांची गरज पाहूनच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मोफत सायकल वाटप केले. तसेच राजुरी (ता. करमाळा) येथील गुळ पावडर बनवणाऱ्या कारखान्याकडे कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे राहिलेले ऊस बिल आ. रोहित पवार यांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना मिळाले आहे.
मा. सुभाष (आबा) गुळवे उपाध्यक्ष, बारामती ॲग्रो लि.



