प्रतिनिधी/प्रविण अवचर


करमाळा तालुक्यातील मांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या रंगरंगोटीचे काम “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. भोंग साहेब व विस्तार अधिकारी श्री. बदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. तात्या बागल यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू च्या संसर्गामुळे गेली दोन वर्षांपासून सर्वच शाळा बंद आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्गांची, शाळांची व शाळेच्या परिसराची खूप दुरवस्था झालेली आहे. यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून “स्वच्छ शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजाराम भोंग साहेब व विस्तार अधिकारी श्री. अनिल बदे साहेब यांचे मार्गदर्शनानुसार शाळेची रंगरंगोटी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. तात्या बागल, मांगी येथील नूतन केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक श्री. संतोष पोतदार, उपशिक्षक श्री. हिरामण कौले, श्रीमती वैशाली पवार, सुवर्णा महामुनी, आशा देमुंडे, यांच्या सहकार्याने वृक्षारोपण व शालेय रंगकाम करण्याचे ठरवले. त्यामुळे शाळेचा चेहरा सुंदर बनत चालला आहे. यामध्ये मांगी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे ही सहकार्य लाभत आहे. गेट, कंपाऊंड व दर्शनी भाग हा आकर्षक रंगरंगोटी ने रंगवल्यामुळे विद्यार्थ्यांना ही शाळेचे आकर्षण वाटत आहे. शासनाचे आदेशानुसार शाळा सुरू झाल्या तर, विदयार्थी संख्या ही वाढेल या हेतूने हे काम हाती घेतले आहे. आज ते पूर्ण होत असून अतिशय सुंदर रंगकाम जामखेड येथील साळवे पेंटर यांनी केले आहे.
मांगी गावातील पश्चिमेकडील प्रवेशद्वाराकडून गावात प्रवेश करताना समोरच शाळा आहे. या भिंतीवरील रंगकाम पाहून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे ही मन प्रसन्न होत आहे. मागील एक महिन्यापूर्वीच मुख्याध्यापक श्री. पोतदार, ईतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले होते.




