
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या व राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन वीटचे सरपंच उदय ढेरे व माजी सरपंच बाळासाहेब ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शेखर तात्या गाडे तसेच पंचायत समिती सदस्य श्री. दत्ता जाधव उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात एकूण १२७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच विश्वरत्न महात्मा ज्योतिराव फुले विचार मंचचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. जगन्नाथ जाधव व करमाळा बाजार समितीचे संचालक देवानंद ढेरे यांच्या वतीने २० टक्के सवलतीमध्ये औषध उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी संपूर्ण आयुर्वेदाचे मार्गदर्शन आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रतापराव पवार यांनी केले. त्यांनी आयुर्वेदाचे संपूर्ण महत्व वीट व पंचक्रोशितील ग्रामस्थांना पटवून दिले व नैसर्गिक जीवनशैली वर आपण जास्तीत जास्त सुंदर व आरोग्यदायी जीवन कसे जगू शकतो याचे सविस्तर विवेचन केले.
यावेळी माजी सरपंच दिलीप काका ढेरे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे, माजी उपसरपंच रवींद्र ढेरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे तर सामाजिक कार्यकर्ते दादाश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष काका काकडे यांच्या हस्ते ज्ञानाई क्रांतिज्योती सावित्री आई फुले याच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बिभीषण आवटे, अविनाश गाडे, सुभाष जाधव, श्रीकांत जाधव इत्यादी मान्यवर तसेच शिबिरासाठी आबालवृद्ध हजर होते. हे शिबीर संपन्न करण्यासाठी विशाल गाडे, भाऊसाहेब जाधव, पंप्पू गाडे, कुंडलिक गाडे, माजी उपसरपंच सचिन गणगे, विकास कांबळे इत्यादी मान्यवरांनी अनमोल असे सहकार्य केले.
या शिबिराचे आयोजन विश्वरत्न महात्मा फुले विचार मंचचे प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ जाधव यांनी केले होते. या शिबिराला करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कोकणे साहेब तसेच यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील, दत्ताभाऊ सरडे यांनी हि सदिच्छा भेट दिली.



