
माय मराठी न्युज नेटवर्क


वारजे, पुणे येथील सदगुरु सेवा प्रतिष्ठान आणि १ अर्थ सोशल फांउडेशन या दोन्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि दानशूर पुणेकरांच्या पुढाकारातून ‘माणुसकीची ऊब’ या सामाजिक उपक्रमांतर्गत ऊस तोडणी बंधू-भगिनी, कामगार आणि त्यांच्या मुलांसाठी साडी, कपडे, ब्लँकेट व स्वेटरचे वाटप करण्यात आले.
पुण्यातील या संस्थेने शिरूर तालुक्यातील मुक्काम पोस्ट मुखई येथील साखर कारखाना परिसरातील ऊसतोडणी चालू असलेल्या कामगारांच्या शेतात हा उपक्रम राबविला. ‘माणुसकीची ऊब’ या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून यावेळी २०० साड्या, २५० शर्ट-पँट, स्वेटर्स आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी मुखई गावातील शेतकरी, शाळेतील शिक्षकवर्ग, संस्थेच्या संस्थापिका वैजयंती गजरे मॅडम, अमित लिपरे, गुरुप्रीत जस्सल, अमित शेलार आदी उपस्थित होते. ऊसतोडणी कामावरील मुकादम म्हणाले की, “ऊस तोडणी मजुरांप्रती आस्था दाखवून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून देण्यात आलेले उबदार कपडे कष्टकरी वर्गाला सुखावणारे आहे. संस्थेने राबविलेले कार्य कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना वैजयंती गजरे मॅडम म्हणाल्या की, “समाजातील दुर्बल घटकातील लोकांना शिक्षणाची जोड मिळाल्यास त्यांची प्रगती होईल. राबणा-या हातांना माणुसकीची ऊब मिळावी हा या उपक्रमामागील उद्देश आहे.” तसेच आमच्या हातून घडलेली सेवा ही सद्गुरू चरणी अर्पण करण्यात आली आहे.



