मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्यासंदर्भात खा. निंबाळकर यांच्या उपस्थितीत सिंचन भवन येथे बैठक सुरू

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पाचा समावेश कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात करावा. या मागणीचे निवेदन माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकरी काल गुरुवार दि. १ जून रोजी पुणे येथे गेले होते. ही बैठक पुणे येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मांगी तलावा वरील शेतकऱ्यांचा पुण्यातील हेलपाटा वाया जाऊ देणार नाही. तसेच उद्या होणाऱ्या सिंचन भवन येथील बैठकीत मांगी तलावाचा विषय मार्गी लावणार असा शब्द शासकीय विश्रामगृह येथील बैठकीसाठी उपस्थित शेतकऱ्यांना दिला होता. त्याप्रमाणे आज पुणे येथील सिंचन भवनमध्ये मांगी तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक लावली आहे.
या बैठकीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, करमाळा भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधिक्षक अभियंता अभय काटकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित आहेत.



