
प्रतिनिधी/संजय साखरे


करमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरी (ता. करमाळा) या गावात ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरांचा दोन वेळा चोरीचा प्रयत्न फसला. हा चोरीचा प्रयत्न रविवार दि. १४ मे २०२३ रोजी च्या रात्री घडला.
रविवारच्या रात्री १२:४० वाजता सोमनाथ जालिंदर धुमाळ यांच्या घरी व रात्री २:४० वाजता तुकाराम अनंता दुरंदे यांच्या घरी तीन ते चार चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत, हे समजताच गावचे सरपंच अमोल दुरंदे आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600) सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली.
यामुळे तात्काळ गावकरी सतर्क झाले तसेच करमाळा पोलीस स्टेशन नाईट राऊंडची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच, चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व दोन्ही घटनांमध्ये चोरांचा चोरीचा प्रयत्न फसल्यामुळे पुढील अनर्थ टळला.



