मकाईच्या विद्यमान संचालकांचेच उमेदवारी अर्ज नामंजूर होणार; संतोष वाळुंजकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
मकाईची निवडणूक थकबाकीवरून गाजणार; शेतकरी कामगार विकास पॅनलचे थकबाकीवरुन गंभीर आरोप

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखाना लि. भिलारवाडी या साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मकाई सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालकांचेच उमेदवारी अर्ज नामंजूर होणार आहेत. अशी धक्कादायक माहिती श्री मकाई शेतकरी कामगार विकास पॅनलच्या वतीने संतोष वाळुंजकर यांनी दिली. ते आज सोमवार दि. १५ मे २०२३ रोजी सायं ६:०० वाजता शासकीय विश्रामगृह, करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, मकाई संचालक मंडळाला साखर आयुक्तांनी विनापरवाना गाळप केल्याबद्दल सात कोटीचा दंड केला आहे. कर्तव्यात कसूर केल्यामुळे हे सर्व संचालक मंडळाचे अर्ज नामंजूर होणार असून शिवाय या प्रत्येक संचालकाकडे विठ्ठल रुक्मिणी पतसंस्था, श्रीगोंदा यांची थकबाकी आहे तसेच विद्यमान संचालक मंडळाचे पॅनल प्रमुख दिग्विजय बागल व रश्मी बागल यांच्याकडे ब्रह्मदेव माने सहकारी बँकेची तसेच जनता सहकारी बँक, उस्मानाबाद या दोन बँकेची कोट्यावधी रुपयाची थकबाकी आहे. हे सर्व थकबाकीदार असल्यामुळे बहुतांश सर्व विद्यमान संचालकांचे उमेदवारी अर्ज नामंजूर होणार, असा दावा संतोष वाळुंजकर यांनी केला आहे.
कारखाना प्रशासन व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरही केले गंभीर आरोप
सतत दोन वर्ष मकाई कारखान्याला गाळप परवाना शासनाने दिला नव्हता. ऊसाला योग्य दर नाही, ऊस दिला तर पैसे वेळेवर नाहीत. मकाई कारखान्याकडे शेतकऱ्यांचे तीस कोटी रुपये देणे बाकी आहे. मात्र कारखान्यात एक किलो सुद्धा साखर शिल्लक नाही. मकाई कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दबावाखाली असून सभासदांना माहिती देत नाहीत. सर्व संचालक थकबाकीदार असताना संबंधित सहकारी संस्थांकडून थकबाकी नसल्याचा दाखला निवडणूक निर्णय अधिकारी मागत नाहीत. ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची यादी देत नाहीत. याबाबतच्या आम्ही सर्व तक्रारी सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केल्या असून वेळप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत. आमच्या लढाईत प्रा. रामदास झोळ यांची साथ आहे.
यावेळी कुणाल पाटील, विशाल पाटील, छत्रपती शासन ग्रुपचे दादा तनपुरे, प्रहारचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, अशोक पाटील, सागर पाटील, कैलास कोकरे, आप्पा बाबर, आप्पा जाधव, प्रकाश गिरंजे आदी उपस्थित होते.



