कृषी विभागाच्या स्टॉलला अनेक मान्यवरांच्या भेटी; विविध ६० प्रकारच्या फळे व भाज्यांचे प्रदर्शन

करमाळा/प्रतिनिधी


लोकनेते दिगंबरराव बागल यांच्या ६८ व्या जयंती निमित्त दिगंबररावजी बागल प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात कृषि व औद्योगिक महोत्सव दि. ९ ते १३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये आयोजीत करण्यात आला होता. सदर कृषि महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे वतीने स्टॉल लावण्यात आला होता. सदर स्टॉलवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये पिकविलेली विविध ६० प्रकारची फळे, भाज्या तसेच पिकांचे नमुने प्रदर्शित करण्यात आलेले होते. याबरोबरच स्टॉलला भेट देणाऱ्या शेतकर्यांना कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यासठी भित्तीपत्रके लावण्यात आली होती.
या कृषि महोत्सवाचे उद्घाटन झाले पासून ते सांगता समारंभ होईपर्यंत पाच दिवसांमध्ये कृषि विभागाच्या स्टॉलला महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब, माजी मंत्री दिलीपजी सोपल, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील, माजी आमदार राजनजी पाटील, विधान परिषद सदस्य रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार श्रीमती शामलताई बागल, परभणीच्या माजी आमदार श्रीमती मीराताई रेंगे पाटील, माजी विधानपरिषद सदस्य दिपक आबा साळुंके, प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर बाळासाहेब शिंदे साहेब, तहसिलदार समीरजी माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व करमाळा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी यामध्ये विशेषतः तालुक्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन स्टॉलला भेट दिली व नाविण्यपूर्ण बाबींची माहिती घेतली. यासाठी तालुका कृषी अधिकारी श्री. संजय वाकडे हे स्वतः व त्यांचे सोबत कृषि विभाग करमाळा येथील सर्व मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक तसेच आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. अजयकुमार बागल व सत्यम झिंजाडे, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेचे तालुकास्तरावरील काम पाहणारे श्री. मनोज बोबडे व मंगेश भांडवलकर यांनी दररोज कृषि विभागाचे स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर्व माहिती दिली व त्यांच्या शंकाचे निरसन केले.
या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आलेल्या वस्तूमध्ये वरकटणे येथील अनंतराव मस्कर यांचे शेतातील ४७ किलो वजनाचा जी-९ वाणाचा केळी घड, वंजारवाडी येथील खांडेकर यांचे शेटनेटमधील लाल व पिवळी ढोबळी मिरची, शेटफळ येथील प्रगतशील महिला शेतकरी हर्षलाताई नाईकनवरे यांचे शेतातील फणस, काळी कोयरी, अंजीर, वॉटर ॲपल, वांगी येथील संदिप यादव यांचे सेंद्रिय उत्पादने यामध्ये गुळ, गुळ पावडर, काकवी, बन्सी गहू, उडीद व काळा ऊस, वाशिंबे येथील भारत झोळ यांची सफेद वेलची जातीची देशी वाणाची केळी तसेच श्री नर्सरी यांचे वतीने वेगवेगळ्या प्रकारची झाडे यामध्ये लाल रंगाची फुले येणारा हादगा, पांढरी जांभूळ, पांढरा फणस, लाल फणस, वॉटर एप्पल, गोड चिंच इत्यादी ठेवण्यात आली होती.
संपूर्ण देशामध्ये सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्याचे प्रचार व प्रसिद्धीसाठी कृषी महोत्सवाचे ठिकाणी भेट देणाऱ्या व्यक्तींना सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पॉईन्ट लावण्यात आला होता. सदरील कृषि महोत्सवामध्ये कृषि विभागाचे स्टॉल लावण्यासाठीचे सर्व नियोजन तालुका कृषी अधिकारी करमाळा श्री. संजय वाकडे यांचे मार्गदर्शनाखाली आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. अजयकुमार बागल व PMFME योजनेचे श्री. मनोज बोबडे यांनी केले. कृषि विभागाचे वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलबाबत कृषि महोत्सवाचे आयोजक श्री. दिग्वीजय भैय्या बागल व रश्मी दीदी बागल यांनी विशेष कौतुक केले.



