
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालय गौंडरे (ता. करमाळा) येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व आठवीतील एन एम एम एस सारथी साठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज सोमवार दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परांडा येथील प्रा. रवींद्र शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष, सचिव व पालक वर्ग उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश भाऊ करे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मार्च २०२२ मध्ये दहावीत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात बक्षीस, सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी या विद्यालयाला दोन स्मार्ट टीव्ही देण्याचे आश्वासन दिले. तसेच अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक रवींद्र शिंदे सर यांनी संस्कारक्षम शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वेळेचे नियोजन कसे करावे, पेपर कसा सोडवावा, भविष्यात आपण आपल्या शाळेचे व आई वडिलांचे नाव कसे उज्वल करावे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केलेल्या दिवसापासून आतापर्यंत त्यांना आलेले अनुभव व्यक्त केले. यावेळी नववीतील विद्यार्थ्यांनी दहावीतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा म्हणून जेवण दिले. तसेच शाळेला दहावीतील विद्यार्थ्यांनी सायन्स हॉल म्हणून शास्त्रज्ञांचे १३ फोटो भेट म्हणून दिले. या कार्यक्रमाला नेरले, आवटी, गौंडरे, निमगाव, कोळगाव, हिसरे व हिवरे येथील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोफणे सर यांनी मानले.



