जागतिक महिला दिनी घारगावच्या सरपंचपदी पाटील गटाच्या लक्ष्मी सरवदे यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


घारगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायत च्या नूतन सरपंच पदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची आज दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी बिनविरोध निवड झाली आहे. घारगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आज ८ मार्च रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत सौ लक्ष्मी संजय सरवदे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जगताप-शिंदे गटाचे उपसरपंच सतीश पवार तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे इतर सर्व सदस्य, माजी सरपंच लोचना पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता होगले, आशा देशमुखे, माजी सरपंच अनिता भोसले, सदस्य दत्तात्रय मस्तुद आदीजण उपस्थित होते. या सर्वांनी सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड केली. ही निवड ८ मार्च या जागतिक महिला दिन रोजी घेण्यात यावी. अशी लेखी मागणी सर्व सदस्यांनी मा. तहसीलदार समीर माने साहेब यांचेकडे केली होती. त्यानंतर त्यांनी या निवडी साठी परवानगी दिली.
या सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी अनिल ठाकर साहेब यांनी काम पाहिले. सोबत तलाठी मयूर क्षिरसागर साहेब तसेच सहाय्यक सोमनाथ खराडे, ग्रामसेवक रवींद्र काळे भाऊसाहेब यांनी काम पाहिले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष ॲड. शशिकांत नरुटे तसेच माजी सरपंच किरण पाटील, कल्याण होगले, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
घारगाव ग्रामपंचायतीची सरपंच निवड ८ मार्च या जागतिक महिला दिनी प्रशासनाने घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी मा. तहसीलदार समीर माने साहेब तसेच मंडळ अधिकारी अनिल ठाकर साहेब, तलाठी भाऊसाहेब श्री मयूर क्षिरसागर व सहाय्यक सोमनाथ खराडे यांचे आभार मानले.



