
करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


कोळगाव सबस्टेशन वरील 3 एमव्ही ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड झाल्याने ऐन उन्हाळ्यात शेतीपंपासाठी फक्त तिनच तास पुर्ण दाबाने वीज उपलब्ध होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावरआत्ता युवासेनेकडुन आवज उठवला गेला असून दोन दिवसात ट्रान्सफार्मर दुरुस्त करून पुर्ण दाबाने सहा तास वीज पुरवठा करा अन्यथा जेऊर महावितरण कार्यालया समोर अमरण उपोषण करू असा इशारा ठाकरे गटाचे युवा सेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.
गेल्या वर्षी युवासेनेकडुन सातत्याने आवाज उठवल्यानंतर आमदार संजयमामा शिंदे यांनी या प्रश्नी लक्ष घालून हा ट्रान्सफार्मर बसवला होता . मात्र सबस्टेशन वर येणारा लोड व तेलगळती या मुळे या ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड झाल्याचे सांगत गेल्या पंधरा दिवसांपासून चारच तास वीज दिली जात असून त्यामध्ये देखील वारवंवार वीज ट्रिप होत असल्याने शेतकऱ्यांना फक्त तिनच तास पुर्ण दाबाने वीज मिळत आहे.
पुर्व भागातील सिना कोळगाव धरणात पाणी साठा असल्याने कोळगाव, निमगाव, आवाटी, गौंडरे ,हिवरे, मिरगव्हाण या परिसरात अनेक शेतकऱ्यांकडून नव्याने उसाची व केळीची लागवड मोठ्याप्रमाणात झालेली आहे, तर काहींची रोपे येवून पडली आहेत वीज अपुरी पडत असल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.जनावरांच्या चाऱ्या साठी अनेकांनी मकाचे प्लाॅट केले आहेत ते वीज नसल्याने जळुन चालली आहेत.
मागच्या आठवड्यात महावितरण कडुन वीज वसुली साठी डिपी सोडवण्याचा सपाटा लावुन मोठ्याप्रमाणात वीज बिल वसुली करण्यात आली आहे. वसूल झालेल्या रक्कमेतुन स्थानिक वीजेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्याचे शासनाचे आदेश असताना महावितरण कडुन जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आवाटी सबस्टेशन चा प्रश्न मार्गी लागेपर्यंत हा ट्रान्सफार्मर अत्यंत आवश्यक असून याची चांगल्या प्रकारे दुरुस्ती अथवा गरज पडल्यास नवीन ट्रान्सफार्मर बसवावा मात्र दोन दिवसात पुर्ण दाबाने सहा तास वीज उपलब्ध करून द्या अन्यथा जेऊर महावितरण कार्यालया समोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा युवा सेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.



