
करमाळा/प्रतिनिधी


बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करमाळा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व चिरंजीव रुद्रांश शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसाच्या निमित्ताने सिनेस्टार क्रांती मुळेगावकर यांचा प्रसिद्ध होम मिनिस्टर या कार्यक्रमासह तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याशिवाय मोफत आरोग्य शिबिर व औषधाचे वाटप तीन दिवस करण्यात येणार आहे. अशी माहिती बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.
आठ तारखेला राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा (वय १४ पर्यंत तीन विद्यार्थ्यांच्या ग्रुप डान्स स्पर्धा) होणार आहेत. नऊ तारखेला सोलो डान्स स्पर्धा होणार असून दहा तारखेला महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या क्रांती मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डान्स स्पर्धेसाठी ५ हजारापासून ते ५१ हजार पर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शिवाय होम मिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्या महिलांना फ्रिज, एलईडी टीव्ही, मोबाईल, पैठणी तसेच उत्तेजनार्थ सहभागी होणाऱ्या महिलांना गिफ्ट वस्तू देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री यांचे सख्खे बंधू ठाण्याचे नगरसेवक प्रकाश शिंदे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, वाकावचे सरपंच पृथ्वीराज सावंत, भैरवनाथ शुगरचे संचालक ऋतुराज सावंत, किरण तात्या सावंत व अन्य पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान धर्मवीर आनंद दिघे सभा मंडपात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रुग्णांना मोफत औषधाचे वाटप करून देण्यात येणार आहे. रुग्णांवर सर्जरी व उपचाराची गरज असल्यास त्यांना मोफत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे सर्जरी करून देण्यात येणार आहे. या शिबिरासाठी बुधरानी हॉस्पिटल पुणे, जुपिटर हॉस्पिटल मुंबई, आनंद ऋषी हॉस्पिटल अहमदनगर व सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर सह ४० डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. डायबिटीस पासून हृदयरोगापर्यंत सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी चाळीस हजार चौरस फुटाचा प्रचंड मंडप टाकून सेट उभा करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा यामधील विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. राज्यस्तरीय सोलो डान्स स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक येणार आहेत. क्रांती मळेगावकर यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी केवळ महिलांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवा सेनेचे निखिल चांदगुडे, विशाल गायकवाड, देवानंद बागल, संजय शीलवंत, रोहित वायभासे, नागेश चेंडगे, नागेश गुरव, जयराज (सोनू) चिवटे, प्रियंका गायकवाड, राहुल कानगुडे, सुधीर आवटे, वैभव मावळकर, प्रशांत नेटके, काका जगताप, दादा थोरात, निलेश चव्हाण, वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख दीपक पाटणे, बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते ॲड. शिरीष लोणकर आदीजण परिश्रम घेत आहेत.



