
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तथा पक्ष जो आदेश देईल तो अंतिम आदेश मानुन होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत. आपल्या भावना वरिष्ठांपर्यत पोहचवुन पक्ष जो आदेश देईल त्या प्रमाणे आपण विधानसभा निवडणुकीत काम करणार असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष (पश्चिम) योगेश बोबडे पाटील यांनी केले आहे. ते कुर्डूवाडी येथे आयोजित माढा तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी बैठक प्रसंगी बोलत होते.
आज शनिवार दि. ०२ नोव्हेंबर रोजी माढा व करमाळा विधानसभा निवडणुक २०२४ च्या निमित्ताने तसेच दिवाळी फराळच्या निमित्ताने माढा तालुका भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी बैठक आयोध्याश्री मंगल कार्यालय, कुर्डुवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणुन सर्व पदाधिकार्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकसभेला आलेले बरे वाईट अनुभव अनेक वक्त्यांनी मांडले. यावेळी तालुकाध्यक्ष (पश्चिम) योगेश बोबडे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला माढा व करमाळा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांसाठी दिवाळी निमित्त फराळाचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीसाठी कुर्डूवाडी मंडळ सरचिटणीस अमोल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष संतोष क्षीरसागर, शहराध्यक्ष अतुल फरतडे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे, महिला तालुकाध्यक्षा प्रतीक्षा गोफणे, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष उमेश पाटील, निवृत्ती तांबवे, बाळासाहेब ढगे यांच्यासह जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुर्डुवाडी मंडलाध्यक्ष अविनाश गोरे यांनी केले तर आभार सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी मानले. यावेळी माढा शहराध्यक्षपदी मदन मुंगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.




