
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा येथील गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित, नवभारत इंग्लिश मेडीयम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये आज बुधवार दि.२२ डिसेंबर रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाची उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिका सौ. अंजली श्रीवास्तव मॅडम या होत्या. तसेच कुमारी भाग्यश्री बनकर (करमाळा शहरातील पहिली महिला इन्कम टॅक्स ऑफिसर), जगदीश अग्रवाल (भाजप शहर अध्यक्ष), अनिल भाऊ वाशिंबेकर (प्रसिद्ध व्यापारी), रघुनाथ शिंदे (एम एस इ बी इंजिनियर), शाळेचे संचालक श्री. विजयकुमार दोशी, अध्यक्ष श्री. कन्हैयालालजी देवी, शाळेच्या सर्वेसर्वा सौ. सुनीता देवी मॅडम व मुख्याध्यापिका सौ. सुनीता मोहिते मॅडम कार्यक्रम प्रसंगी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती पूजन करण्यात आले. मार्च पास करण्यात आले. त्यानंतर ऊर्जेचे प्रतीक म्हणून मशालीचे प्रज्वलन करण्यात आले.
विद्यार्थी जीवनामध्ये बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही तेवढाच महत्त्वाचा असतो. सध्या मुले मोबाईलवर गेम खेळण्यातच आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत आहेत. त्यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणूनच या क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले आहे.
यामध्ये रनिंग रेस, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, लिंबू चमचा, लांब उडी, बेडूक उडी, लंगडी, संगीत खुर्ची, रस्सीखेच, गोळा फेक अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रेड डिफेंडर, येलो स्ट्रायकर्स, ब्ल्यू चॅलेंजर्स आणि ग्रीन कॉन्करस असे ग्रुप पाडण्यात आले होते. वेगवेगळ्या रंगाचे शर्ट तसेच मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे एकूणच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




