
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील दिमलेश्वर गावचे सुपुत्र युवा गिर्यारोहक स्वप्निल दिलीप मोरे यांनी ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला वजीर सुळक्या वरती (२५० फूट उंच) यशस्वी चढाई केली. तसेच स्वप्नील मोरे यांनी या अगोदर नॉर्थ सिक्कीम येथील अल्ड पर्वत (१७०००) फूट उंच आणि वेस्ट सिक्कीम येथील बी. सी. रॉय (१८०००) फूट उंच पर्वतावरती यशस्वी चढाई केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील माहूली किल्ल्याच्या पायथ्याशी वजीर सुळका आहे. ज्याची उंची २५० फूट एवढी आहे. तर माहूली किल्ला हा समुद्र सपाटीपासून २ हजार ८०० फूट उंच आहे. हा वजीर सुळका सर करण्यासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजूने खोल दरी, पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास ६०० फूट आणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे. या सुळक्यावर ट्रेकिंग करताना इकडचा पाय तिकडे पडला तर थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती.

स्वप्निल मोरे व त्याच्या सहकाऱ्यांनी रविवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ३ वाजता उठून ४.३० ते ७:३० दरम्यान तीन तासाचे ट्रेकिंग केले आणि ते वजीर सुळक्याच्या पायथ्याशी पोहचले. त्यानंतर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांनी वजीर सुळका सर केला.
या मोहिमेत करमाळा तालुक्यातील दिलमेश्वर गावचे सुपुत्र DMSF koyana Adventure’s चे प्रमुख युवा गिर्यारोहक स्वप्निल दिलीप मोरे आणि S.l adventure चे प्रमुख गिर्यारोहक लहू उघडे, गिर्यारोहक कृष्णा मरगळे, गिर्यारोहक तुषार दिघे हे सहभागी होते.
९० अंशातील २५० फूट उंच भला मोठा वजीर सुळका, महाराष्ट्रातील चढाईसाठी सर्वात अवघड आहे. यात अनुभवी गिर्यारोहक असेल तरच वर चढण्याचे आवाहन पेलवते. युवा पिढीला इतिहासाची ओळख आणि आवड निर्माण व्हावी. यासाठी आम्ही युवकांना संघटित करून महाराष्ट्रभर असलेल्या गडकिल्ल्यांची सफर मोहीम हाती घेतली आहे.
गिर्यारोहक स्वप्निल मोरे.



