
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


शेतकऱ्याच्या मुलाची MBBS साठी निवड होते हि बाब कौतुकास्पद असून भविष्यात प्रवीण बंडगर यांने गोरगरीबांची सेवा करून वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक करावा असे मत युवा सेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी व्यक्त केले. ते आवाटी येथील प्रवीण बंडगर यांची MBBS साठी निवड झाल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
आवाटी (ता. करमाळा) येथील शेतकरी अनिल द-याप्पा बंडगर यांचा मुलगा प्रवीण बंडगर याची MBBS साठी निवड झाली असून शासकीय महाविद्यालय जळगाव येथे प्रवेश मिळवला आहे. प्रवीण बंडगर यांच्या या यशानंतर आवाटी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवर, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांकडून जंगी सत्कार करण्यात आला. प्रवीण बरोबरच प्रवीणचे वडील व चुलते यांचा देखील गावकऱ्यांनी फेटा हार घालून सत्कार केला.
यावेळी अधिक बोलताना फरतडे म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जिवघेणी स्पर्धा असताना अतिशय हालाखीच्या परिस्थीतीत प्रवीण बंडगर यांनी निटची परिक्षा देऊन सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. हि बाब निश्चितच कौतुकास्पद असून इच्छा शक्ती असेल तर परिस्थितीचा बाऊ न करता यश संपादन करता येते. हे प्रवीण बंडगर याने दाखवून दिले असून ग्रामीण भागातील युवक, विद्यार्थ्यांसाठी हि बाब आदर्श घेण्याजोगी आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय प्रश्न बिकट असून भविष्यात डाॅक्टर होवुन ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णासांठी सर्व सोयीयुक्त अद्यावत हाॅस्पिटल उभारावे अशा शुभेच्छा फरतडे यांनी दिल्या. यावेळेस जालिंदर हराळे, बिरमल तरटे, राजू खान, नसरुल्ला खान आदि उपस्थित होते.
मुलाने गोरगरीबाची सेवा करावी
आमचा पोरगा डाॅक्टर होणार याचा आम्हास खुप आनंद आहे. मुलाने मोठ्ठा डाॅक्टर होऊन गोरगरीब आडल्या नडल्याची सेवा करावी हेच सपान आहे. अशी भावनिक प्रतिक्रिया प्रवीणचे वडील अनिल बंडगर व चुलते ब्रह्मदेव बंडगर यांनी बोलून दाखवली.




