
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील युवक खोके सरकारला जागा दाखवून देतील असा इशारा युवासेना माजी तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी दिला. वेदांता आणी फॉक्सकॉन कंपनीचा १.४५ लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या व एक लाख युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा उद्योग शिंदे-फडणवीस सरकारच्या हलगर्जीपणा मुळे गुजरात ला गेल्याच्या निषेधार्थ केलेल्या स्वाक्षरी मोहीम आंदोलना दरम्यान फरतडे बोलत होते.
याप्रसंगी युवा सेना जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, सोशल मिडीया समन्वयक अजय साखरे, केम शहर प्रमुख दिपक भिताडे, संतोष गुटाळ, ओंकार जाधव, मंगेश तळेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी अधिक बोलताना शंभूराजे फरतडे म्हणाले की, चाळीस गद्दारांनी इडीच्या धाकाने व खोक्याच्या आमीषाने मातृतुल्य शिवसेनेशी गद्दारी केली व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे व हिंदुत्वाचे सोंग घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार केले, शिवसेनेवर दावा ठोकला, बाळासाहेबांचे प्राणप्रिय धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली. हे सर्व कमी कि काय म्हणुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी राखण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या पाठित खंजीर खुपसून वेदांता व फॉक्सकॉन कंपनी गुजरात सरकारला आंदण केली. या सरकारच्या विरोधात विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला यासह सर्वमान्य जनतेमध्ये संतापाची सुप्त लाट असून या लाटेत हे सर्व उध्वस्त होतील असे म्हटले.
शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, विधान सभा संघटक संजय शिंदे, शहरप्रमुख प्रवीण कटारीया, शिवाजीराव माने, शिवसेना उपशहर प्रमुख संजय भालेराव, पंकज परदेशी, जेष्ठ शिवसैनिक माजी उपशहरप्रमुख गाणबोटे यांनी या स्वाक्षरी मोहीमेला भेट दिली.



