-->
क्राईमराज्य

दुर्दैवी घटना! पाणी टंचाईने घेतले बळी; खदानीत बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवली जवळील संदप या गावात शनिवारी (दि.०८) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. संदप गावासह आसपासच्या देसले पाडा, भोपर आदी परिसरात पाणी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संदप गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. शनिवारी सायंकाळी ६:०० वाजल्याच्या सुमारास देसले पाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील पाणीटंचाईचे हे बळी असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने खदानीत शोध कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तास शोधकार्य करून या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर हे मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

यामध्ये अपेक्षा गौरव गायकवाड (वय २८), मीरा सुरेश गायकवाड (वय ५५), मयुरेश मनीष गायकवाड (वय ०८), मोक्ष मनीष गायकवाड (वय २२) आणि सिध्देश कैलास गायकवाड (वय १२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून हे सर्व डोंबिवली जवळील देसलेपाडा येथील राहणारे होते. पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या घरातील हे सर्वजण होते. नांदिवली, देलसेपाडा, भोपर या गावात तीव्र पाणीटंचाई आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी येते. त्यामुळे पाण्यासाठी रहिवाशांना खदानी, विहिरीवर जावे लागते. या पाणी टंचाईतूनच ही दुर्दैवी घटना घडली असल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close