-->
करमाळासामाजिक

मांगी तलावाचा समावेश कायमस्वरूपी कुकडी लाभक्षेत्रात करा; राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

मांगी (ता. करमाळा) तलावाचा समावेश कायम स्वरूपी कुकडी लाभक्षेत्रात करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा यांच्या वतीने माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथील आढावा बैठकी प्रसंगी सदर निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश नसल्यामुळे सततची मागणी करून देखील मांगीला हक्काचे पाणी मिळत नाही. तालुक्याच्या उत्तरेला १९५५ मध्ये तयार झालेला मांगी तलाव कान्होळा नदी व पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. या तलावात कर्जत तालुक्यातील २२ तर करमाळा तालुक्यातील ६ बंधाऱ्यांमुळे पाणी टेल टू हेड पर्यंत येत नाही. मांगी तलावाचा कुकडीत सामावेश झाल्यास २५ गावांना हक्काचे पाणी कायमस्वरूपी मिळू शकते. तसेच या भागातील संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकर्याचा आर्थिक हातभार वाढेल. यामुळे कुकडी मधून दर वर्षी १ टीएमसी पाणी मिळणे हाच एकमेव पर्याय आहे.
कुकडीच्या लाभक्षेत्रात १ टीएमसी पाणी मांगी तलावाला येत नसल्याने पाणी येण्यासाठी सतत चोरी, पळवापळवी होऊन दुर्लक्षित केले जाते. त्यातच मांगी पासून काही अंतरावर नव्याने एमआयडीसी सुरू होत आहे. परंतु तेथे पाणी नसल्याने अद्याप ते काम रखडले आहे. तोही तालुक्याचा महत्वाकांक्षी विषय धूळ खात पडून आहे.
करमाळा तालुक्यातील २२ हजार हेक्टर क्षेत्र कुकडीच्या लाभक्षेत्रात आहे. त्यामध्ये मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश नाही. मागणीनुसार कायमस्वरूपी पाणी न येता सल्लागार समितीच्या निर्णयानंतर अनेकदा केवळ थोड्या प्रमाणात पिण्यासाठीच पाणी सोडले जाते. मांगी तलावाच्या वरील भागात छोटे-मोटे बंधारे व उप कॅनाॅल चाऱ्या असल्याने आणि लांबीचे अंतरामुळे पाणी तलावात येत नाही. त्यामुळे मांगी तलावाचा कायमस्वरूपी कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून बोगदा अथवा पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचे नियोजन करावे. शिवाय टिंभे, येडगाव धरणांना जोडणारा बोगदा झाल्यास अंतर कमी होऊन येडगावला पाणी वाढेल. त्यातून पाणी आणणे अधिक सोपे होईल. अशा तिसऱ्या पर्यायावरही आपल्या स्तरावर विचार करून मांगी तलावात हक्काचे कायमस्वरूपी एक टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी म्हटले आहे.
यावेळी रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, रासप ता. उपाध्यक्ष विठ्ठल भिसे, विधानसभा अध्यक्ष शंकर सुळे, जिवन होगले, नरेंद्रसिह ठाकुर, तालुका सरचिटणीस शाम सिंधी, ता.अध्यक्ष राज शेटे देशमुख, डाॅ. भाग्यवंत बंडगर, प्रविण होगले, नेते सुहास ओहोळ, माजी सरपंच संदिप मारकड, विलास घोणे, तानशेन खांडेकर, संजय जमदाडे, रावसाहेब बिनवडे इत्यादी उपस्थितीत होते.
करमाळा तालुक्यातील उत्तर भागातील इंग्रज कालीन ऐतिहासिक असलेल्या मांगी तलावाची निर्मीती सन १९५५ ला झाली. या तलावाचा उजवा कालवा २७ तर डावा कालवा ९ कि.मी. चा व मध्यभागी कान्होळा नदीच्या प्रवाह आहे. १९५७ ला मांगी कालवा पूर्ण होऊन पहीले आवर्तन सोडले. मांगी तलावाची १ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. या तलावाच्या ओलिताखाली जवळपास २०५० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र, शेतकऱ्यांची जनावरे आणि पाणी वापर संस्था अवलंबून आहे. त्या अंतर्गत बोरगाव, हिवरवाडी, वडगाव, पूनवर, भोसे अशा कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या शासकीय प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. “धरण उशाला तर कोरडं घशाला” अशी परिस्थिती मांगी तलाव लाभ क्षेत्रावरील २५ गावाची आहे. त्यामुळे अशी वैशिष्ट्य पूर्ण गावं कर्जत, श्रींगोदा, करमाळा परिसरातील पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात. अन्यथा दुष्काळ व टॅकरने पाणी घ्यावे लागते.

या गावांना होतो फायदा…
या अंतर्गत मांगी, पोथरे, बिटरगाव, तरटगाव, पोटेगाव, पाडळी, बोरगाव, निलज, करंजे, भालेवाडी, खांबेवाडी, अर्जुननगर, बाळेवाडी, मिरगव्हाण, दिलमेश्वर, बोरगाव, घारगाव, रावगाव, वडगाव (ऊ), वडगाव (द), पूनवर, हिवरवाडी, भोसे यासह परिसरातील २२ ते २५ गावांना याचा नक्कीच लाभ होणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close