-->
करमाळाविशेष

झी टॉकीज फेम ‘या’ महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने वडगाव द. येथील सप्ताहची सांगता

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर सालाबाद प्रमाणे याही वर्षी वडगाव द. (ता. करमाळा) येथे शुक्रवार दि. १२ ऑगस्ट २०२२ ते शनिवार दि. १९ ऑगस्ट २०२२ या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. यामध्ये आज (दि.१९) रोजी सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत झी टॉकीज  या मराठी चैनल वरील ‘मनमंदिरा’ या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले विनोदाचार्य, समाज प्रबोधनकार ह.भ.प. विनोद महाराज रोकडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.

 

सात दिवस चाललेल्या या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये कीर्तनकार ह.भ.प. बापू महाराज कांबळे मोरवड, ह.भ.प. अनिताताई महाराज शिंदे पोथरे, ह.भ.प. प्रदीप महाराज ढेरे वीट, ह.भ.प. नाना महाराज गणगे वीट, ह.भ.प. सुखदेव महाराज कुंभार खडकी, ह.भ.प. रामदास महाराज निंबाळकर रावगाव, ह.भ.प. बबन महाराज विंचू करमाळा, यांनी आपली कीर्तन सेवा बजावली. तर दररोज सकाळी नाष्टा व संध्याकाळी जेवणाची व्यवस्था विणेकारांनी केली होती.

 

ह.भ.प. विनोद महाराज रोकडे यांनी आपल्या कीर्तनात सांगितले की, वारकरी संप्रदाय कधीही अंधश्रद्धेला थरा देत नाही. पण श्रध्दे शिवाय देव भेटत नाही हेही तितकच खरं आहे. माणसाच्या कपड्यावर पडलेला डाग साबणाने धुतला जातो. पण चरित्रावर पडलेला डाग पुसणे शक्य नाही म्हणून माणसाने जीवन जगताना आपल्या चारित्र्यावर डाग पडणार नाही याची काळजी घ्यावी. याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा प्रसंग व कृष्णलीला सांगून दुपारी बारा वाजता दहीहंडी फोडून आपल्या कीर्तन सेवेची सांगता केली.

 

काल्याच्या कीर्तनानंतर वडगाव द. ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रावगाव, शेळके वस्ती, रोडगे वस्ती, वडगाव उत्तर, मांगी, भोसे, हिवरवाडी व वडगाव दक्षिण तसेच पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close