शेतकऱ्यांच्या घामाचे दाम कधी देणार? शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नका – शाहुराव फरतडे

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


उस गाळपास जावुन सहा महिने पुर्ण झाले मात्र आजुन देखील शेतकऱ्यांच्या घामाचे दाम शेतकऱ्यांना मिळाले नसून कारखाना प्रशासना कढुन शेतकऱ्यांना फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नका लवकरात लवकर बिलं द्या अन्यथा तिव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी दिला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पाया पडून मिळेल त्या कारखान्यांना शेतकऱ्यांनी उस गाळपास दिला. तालुक्यातील अन्य गावांसह पुर्व भागातील हिसरे, फिसरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे, हिवरे, अर्जुननगर, मिरगव्हाण, सौंदे, फिसरे आदी गावातील शेतकऱ्यांनी पाचपुते यांच्या साईकृपा हिरडगाव, शिंदे बंधु च्या कमलाई, धनंजय महाडिक यांच्या भिमा शुगर ला मोठ्या प्रमाणात उस दिला आहे. मात्र सहा महिने झाले तरी शेतकऱ्यांचे पैसै देण्याची तरतूद या कारखान्याकडुन झालेली नाही. उस गाळपास जात असताना टोळीने एकराला सहा हजार वरुन दारु, मटनाची पार्टी, ड्रायव्हर ला दोनशे, मशिनने तोडायचा झाल्यास एकराला सहा हजार मोजावे लागले. मात्र मजबूर असलेल्या शेतकऱ्यांनी गपगुमाने हे पैसै मोजून उस गाळपास पाठवला आहे. काही शेतकऱ्यांना तर उस घालवण्यासाठी व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली होती हे वास्तव आहे. बिल देताना कारखाना प्रशासना कडुन होत असलेली अडवणूक शेतकऱ्यांना पुन्हा सावकारी पाशात अडकवत आहे असे ही फरतडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
उस गेल्यानंतर येणाऱ्या बिलातुन शाळकरी मुलांना नवी पांघुरणं, कारभारणीला नव लुगडं, घेण्याचं स्वप्न शेतकरी पाहत असतो. पिक कर्जाचं सोसायटीचं नव जुन करुन येणाऱ्या पैशातून शेतीची मशागत, बियाणे, खते याची भागता भागत करुन पुन्हा नव्या आशेवर शेतकऱ्यांचा प्रपंच सुरु असतो. मात्र कारखानदार हे उस घेऊन गेलो हाच उपकार समजा नाहीतर बांधावर टाकून द्यावा लागला असता या गुर्मीत आहेत. मान्य आहे तुमचे उपकार झाले, अडचणीत असताना तुमचे सहकार्य झाले. मात्र, आम्ही शेतकऱ्यांनी उस लावला नसता तर तुमच्या कारखान्यात काय कुसाळं गाळली असती का? शेतकऱ्यांकडून उस तोडण्यासाठी अडवणूक करून पैसै लुटून तुमच्या उसतोड टोळ्या कमवून गेल्या. मशिनवाले निल झाले हे फक्त शेतकऱ्यांनी उस पिकवला म्हणून शक्य झाले याचा विसर पडू देऊ नका. असे आवाहन देखील फरतडे यांनी कारखानदारांना केले असुन साखर आयुक्त, तहसीलदार यांनी या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल याची नोंद घ्यावी असे फरतडे यांनी म्हटले आहे.




