उद्यापासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन टेल टू हेड चालणार; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायीनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन उद्या बुधवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असून हे आवर्तन टेल टू हेड या पद्धतीने चालेल अशी माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. सध्या उजनी धरणामध्ये जवळपास ८० टक्के पाणीसाठा असल्यामुळे व दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आवश्यक तेवढा पाऊस नसल्यामुळे, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे आवर्तन सुरू केलेले आहे. या आवर्तनाच्या पाण्यामधून शेतकऱ्यांनी आपले तलाव, नाले, बंधारे भरून घ्यावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे.
सायफण दिसल्यास गुन्हा दाखल करणार-उपअभियंता संजय अवताडे
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टप्पा १ व टप्पा २ यांच्या मुख्य कालवा व वितरिकेवर अनेक शेतकरी सायफणद्वारे पाणी घेत आहेत. सायफणद्वारे हे पाणी घेणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई या प्राधिकरणाच्या कायद्यानुसार नियमबाह्य असून जे शेतकरी असे सायफणद्वारे पाणी घेतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. १२ चे अभियंता संजय अवताडे यांनी दिली.
सायफण काढणे संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायतीला यापूर्वीच नोटीस दिलेली आहे. त्याबरोबरच वर्तमानपत्रामधून प्रसिद्धीकरणही केलेले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सोशल मीडिया मधून सायफण काढणे विषयी शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून मुख्य कॅनॉल मधील सायफण काढावेत व आपल्यावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन संजय अवताडे यांनी केले आहे.




