
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आमदार संजय शिंदे गटाने सुजित तात्या बागल यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १३ पैकी ११ जागा जिंकत बागल गटाला जबरदस्त धक्का दिला आहे.
मांगी सोसायटीची निवडणूक खुद्द माजी आमदार शामलताई बागल यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी या निवडणुकीसाठी स्वतः उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र ब्रह्मदेव माने सहकारी बँकेच्या थकबाकीबाबत सुजित बागल यांनी आक्षेप घेत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. तसेच सुजित बागल यांच्याकडे ही जयवंत मल्टीस्टेटची बाकी आहे. असे सांगत त्यांच्या अर्जावर बागल गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र सुजित बागल यांनी एकरकमी कर्जफेड करून आपला अर्ज मंजूर करून घेतला होता.
या निवडणुकीत बागल गटाला नारायण पाटील गटाचे समर्थक देवानंद बागल यांनी पाठिंबा दिला होता. पाटील गट व बागल गट एकत्र असताना आ. शिंदे गटाने दोघांनाही धोबीपछाड देत १३ पैकी ११ जागा जिंकून एक हाती संस्था ताब्यात घेतली आहे.
या निवडणुकीत एकुण ४१७ पैकी ३८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- राजेंद्र बागल (१९२), दिवाण बागल (१९२), संभाजी बागल (१९०), सुजीत बागल ( १९९), वैभव बागल (१८८), विठ्ठल बागल (१७६) दिलीप बागल (१७३), उमेश बागल (२०४), अश्विनी बागल (२१०), प्राची नलवडे (१८७), मंगल खरात (१९४), सुजीत बागल (२११), अभिमान अवचर (१९९) यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सौ. एस. के. मुंढे यांनी काम पाहीले.
हा तर कामाचा विजय!!!
-सुजित बागलआमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने मांगी गावात काम चालू असून प्रत्येक गावकरी कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात आहेत. सोसायटीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे मांगीतील जनतेने आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आमच्या पॅनलला निवडून दिले. उसाचा गंभीर प्रश्न आमदार संजय मामा शिंदे यांनी सोडविला आहे. म्हणून हा विजय आमचा नसून आम्ही केलेल्या कामाचा आहे.



