माय मराठी न्यूज नेटवर्क


राज्यात उष्णतेची लाट दिसून येत आहे. या पुढे ही उष्माघाताची लाट असणार आहे. विदर्भात उन्हाचे अधिक चटके बसतील अशी स्थिती राहणार आहे. दरम्यान, परभणी, अमरावती, नागपूर येथे उष्णतेचा कहर दिसून येत आहे. परभणीत लग्नाच्या वरातीत उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वरातीत नाचल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परभणीत तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहोचला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्ह्यात मित्राच्या लग्न वरातीत नाचून थकलेल्या एका युवकाने थंड पाणी पिल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जिंतूरचे सराफा व्यापारी धनंजय शहाणे यांचा मुलगा सोहम हा मित्राच्या लग्नासाठी भर दुपारच्या उन्हात मोटारसायकलवरून परभणीत आला होता.
लग्नाच्या वरातीत नाचल्या नंतर तो काहीसा थकला. तहान लागल्याने त्याने थंड पाणी घेतले. मात्र, त्यानंतर त्याला अचानक उलटी झाली. त्याला परभणी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचार सुरू असताना सोहमचा मृत्यू झाला. सध्या परभणीत तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअस इतका आहे. भर उन्हात नाचल्याने उष्माघातानेच सोहमचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.




