-->
करमाळाविशेष

अखेर..धरणग्रस्तांना संघर्षातून मिळाला न्याय; अडीच वर्षानंतर शेलगाव ते ढोकरी रस्ता नागरिकांसाठी खुला

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्यातील उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या ढोकरी, बिटरगाव, भिवरवाडी, वांगी नं.१, वांगी नं.४, नरसोबावाडी या गावांसाठी महत्त्वाचा असलेला शेलगाव ते ढोकरी हा रस्ता वांगी नं.३ येथील अडथळा दूर करून तब्बल अडीच वर्षाच्या धरणग्रस्तांच्या संघर्षातून काल खुला करण्यात आला. दररोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी रस्ता खुला झाल्याने धरणग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून या कामी लोक रस्ता संघर्ष समितीचे आभार व्यक्त करत आहेत.

 

 

१९७६ साली उजनी धरणासाठी सर्वस्व त्यागलेल्या धरणग्रस्तांची गावठाणे जलाशयाच्या काठावर स्थापीत झाली. त्यावेळी करमाळा तालुक्यातील २२ गावांना जलसमाधी मिळाली. याच २२ गावांची जलाशय काठावरील भौगोलिक रचनेमुळे ३० गावे झाली. यामध्ये मोठे क्षेत्र असलेल्या वांगी, चिखलठाण, खातगाव, सोगाव, केतूर आदी गावांची एका पेक्षा जास्त गावात विभागणी झाली. वांगीची वांगी नं.१, वांगी नं.२, वांगी नं.३, वांगी नं.४ अशी चार गावे झाली. या पुनर्वसीत गावांना नागरी सुविधा पुरवणे कायद्याने बंधनकारक असल्याने गावठाण अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते आदी १८ नागरी सुविधांचा त्यात समावेश आहे.

 

 

पूर्वीचा अहमदनगर टेंभूर्णी हा राज्यमार्ग वांगी नं.१ व ३ च्या मध्ये आणि धडसवाडी येथे उजनीचे पाणी पाठीमागे सरकल्याने पाण्याखाली गेला. त्यामुळे हा रस्ता शेलगाव पासून पांगरे, कवीटगाव मार्गे कंदरला गेला. त्यामुळे या परिसरातील ढोकरी, भिवरवाडी, बिटरगाव, वांगी १, वांगी ४, नरसोबावाडी या गावांना पोहोच रस्ता वांगी नं.३ येथून जुन्या निंभोरे रस्त्याने वांगी नं.१ पर्यंत तयार करण्यात आला. तो १९७६ सालापासून वहिवाटा खाली होता. यावर राज्य शासन तसेच जिल्हा परिषद यांनी निधी खर्च करून खडीकरण, डांबरीकरण केले. इतकेच नव्हे तर २०१४-१५ मध्ये शेलगाव ते ढोकरी दरम्यान १४ किमी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून भव्य व मजबूत रस्ता देखील करण्यात आला आहे. परंतु वांगी नं.३ येथील गावठाण लगत ४४ वर्षानंतर महेश आप्पासाहेब रोकडे व त्यांचे इतर बंधू यांनी रस्ता मोडून त्यावर ऊस लागवड केली. त्यामुळे या भागातील दहा हजार नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता बंद झाल्याने लोकांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले. ऊस, केळी यासारखी पिके घेणे व दुग्धव्यवसाय ठप्प झाले. शाळकरी मुले-मुली, वृध्द नागरिक, दुचाकी, चारचाकी वाहनधारक व एस.टी. बस येणे जाणे बंद झाले.

 

सदर रस्ता पूर्ववत चालू करण्यासाठी अनेक चर्चा, बैठका निष्फळ ठरल्या. या भागातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते गट तट विसरून एकत्र आले आणि त्यातूनच धरणग्रस्तांनी “रस्ता संघर्ष समिती” ची स्थापना केली. रस्ता संघर्ष समितीने ढोकरी, बिटरगाव, वांगी ग्रामपंचायतीचे रस्ता सुरू करण्यात यावा. यासाठी ठराव घेउन ते शासन दरबारी दिले. मामलेदार ॲक्ट कलम ०५ प्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यासाठी करमाळा तहसीलदार यांच्याकडे सनदशीर मार्गाने दावा दाखल केला. परंतु यातील राजकीय हस्तक्षेपामुळे करमाळा तहसीलदार यांच्याकडील दाव्याची तक्रार माढा तहसीलदार यांच्याकडे वर्ग करण्यात आली. तरीही दिरंगाई व्हायची ती झाली आणि प्रकरण तब्बल दोन वर्ष रखडले.

 

या दरम्यान तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील, जयवंतराव जगताप, आमदार संजय शिंदे यांची शिष्टाई देखील निष्फळ ठरली. अखेर जिल्हाधिकारी यांच्याकडे या बाबतीत निर्णय करण्यासाठी आमदार संजय शिंदे यांनी प्रयत्न केले. परंतु रोकडे बंधूची मागणी गैरवाजवी असल्याचे जिल्ह्याधिकारी बैठकीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे भाड्याचे भाड्याचे माढा चे तहसीलदार यांना कलम ०५ प्रमाणे रस्ता खुला करण्याचा आदेश करावा लागला.

 

 

रस्ता संघर्ष समितीचा झाला विजय

करमाळा न्यायालयात ही मेहेरबान कोर्टाने रोकडे बंधूंची याचिका फेटाळून लावली. रस्ता संघर्ष समिती च्या विचाराने ॲड. राकेश देशमुख यांनी समर्थपणे धरणग्रस्तांची बाजू लढवली. शेवटी रस्ता खुला करण्याचा आदेश वेगवेगळ्या कारणाने सतत पुढे पुढे सरकला. पण अखेरीस काल दि.२४ मार्च रोजी मंडलाधिकारी वळेकर, तलाठी हेड्डे यांनी कलम ०५ प्रमाणे कार्यवाही करून सर्व सामान्यांसाठी रस्ता खुला केला आणि रस्ता संघर्ष समितीचा विजय झाला.

 

 

यावेळी रस्ता संघर्ष समितीचे सदस्य व बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष महेंद्र पाटील, आदिनाथचे माजी संचालक भारत साळुंके, वांगीचे सरपंच विठ्ठल शेळके, अर्जुन आबा तकीक, शेतकरी संघटनेचे हनु यादव, दत्ता देशमुख, सुधीर देशमुख, तानाजी देशमुख, बिभीषण देशमुख, उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे, ग्रा.स. राजकुमार देशमुख, डाॅ. शेळके, हनुमान धनवे, महादेव नलवडे, तात्या मामा सरडे, सचिन देशमुख, ढोकरीचे सरपंच किरण बोरकर, माजी सरपंच महादेव वाघमोडे, पांडुरंग खरात, आशिष बंडगर, बाळासाहेब महानवर, सौदागर नलवडे, देविदास तळेकर, हरि तकीक, प्रतिवादी रोकडे बंधू, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता भिलारे, जि.प. सार्वजनिक बांधकामचे उप. अभियंता गायकवाड व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

उजनी धरणग्रस्तांचे शेलगाव ते ढोकरी रस्ता अडवल्याने प्रचंड हाल झाले. रस्ता संघर्ष समितीने अथक प्रयत्न करून सनदशीर मार्गाने यश मिळवले. सदरचा रस्ता हा इजिमा असून या रस्त्याची रुंदी साधारणता २४ मीटरची परंतु प्रशासनाने फक्त १२ फूट रुंदीचा रस्ता खुला करून दिलेला आहे. यापुढे रस्त्यावरील अतिक्रमणे काढून अडथळा दूर करून रस्ता रुंद करावा. तसेच दोन वाहने बसतील अशा पद्धतीचा रस्ता करण्याकरिता अंतरातील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी व निधी मिळवण्यासाठी रस्ता संघर्ष समिती यापुढेही कंबर कसणार आहे.

प्रा.शिवाजीराव बंडगर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, करमाळा 

 

उजनी धरणासाठी सर्वस्व त्यागलेल्या धरणग्रस्तांचे नागरी सुविधा मिळविताना ४५ वर्षानंतर ही हाल सुरू आहेत. गैरवाजवी व अवास्तव मागणी करून लोकांचे जनजीवन कोणीही विस्कळीत करू नये. रस्ता संघर्ष समिती यापुढे अपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून घेणार आहे.

महेंद्र पाटील,  माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close